ग्रामपंचायत सागावे येथील विहिरीचे पाणी गेली दोन वर्षांपासून दूषित
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, नागरिक संतप्त
ग्रामपंचायत सागावे येथील विहिरीचे पाणी गेली दोन वर्षांपासून दूषित
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, नागरिक संतप्त

मनोर (प्रतिनिधी):
ग्रामपंचायत सागावे येथील मुख्य विहिरीचे पाणी गेल्या दोन वर्षांपासून दूषित झाले असून त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
येथील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी दाखल केल्या. मात्र ग्रामसेवक तसेच सरपंच यांनी या गंभीर प्रश्नाकडे आजतागायत पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले, वृद्ध व महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला असताना ग्रामपंचायतने कोणताही पर्यायी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध करून दिलेला नाही. टँकर, बोअरवेल किंवा शुद्ध पाण्याची तात्पुरती व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
याशिवाय गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आली आहे. काम अपूर्ण राहिल्यामुळे गावकऱ्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही. या योजनेकडेही ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सागावे गावातील नागरिक पूर्णपणे संतप्त व त्रस्त झाले असून, लवकरात लवकर दूषित विहिरीच्या पाण्याची तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.