Uncategorized

चिंचणी–तारापूर परिसरातील शिक्षणमहर्षी रजनीकांतभाई श्रॉफ यांचा ९० वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा

चिंचणी–तारापूर परिसरातील शिक्षणमहर्षी रजनीकांतभाई श्रॉफ यांचा ९० वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा
चिंचणी (प्रतिनिधी)
चिंचणी–तारापूर परिसरातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि समाजभान जपणारे आदरणीय शिक्षणमहर्षी रजनीकांतभाई पुरुषोत्तमदास श्रॉफ यांनी आपल्या जीवनाची गौरवशाली ९० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता के.डी. हायस्कूल मैदान, चिंचणी (ता. डहाणू) येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

२ जानेवारी १९३६ रोजी जन्मलेले रजनीकांतभाई श्रॉफ हे के.डी. हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून १९६६ पासून आजतागायत संस्थेचे चेअरमन पद समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी यू.डी.सी.टी. (UDCT) येथून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. मात्र नोकरी अथवा उद्योग व्यवसाय न करता, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी समर्पित केले.

“पंचक्रोशीतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये” या ध्येयाने प्रेरित होऊन, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. आज संस्थेच्या सात शाखांमध्ये के.जी. ते पी.जी. पर्यंतचे शिक्षण उपलब्ध असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांवर आधारित शिक्षणव्यवस्था उभी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

१९७२ साली मुंबईतील बोरीवली येथे त्यांनी स्वतःच्या खर्चाने भाड्याने खोली घेऊन खाजगी वसतिगृह सुरू केले, ज्यामध्ये चिंचणी परिसरातील सर्वधर्मीय, सामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्याच धर्तीवर चिंचणी येथील शैक्षणिक संकुलातही दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी खाजगी वसतिगृह सुरू करून गेल्या सहा वर्षांपासून निवास व भोजनाची विनामूल्य सोय करण्यात येत आहे.

शैक्षणिक विकासासोबतच सौरऊर्जा, कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, कौशल्य विकास, योग–प्राणायाम व निसर्गप्रेम हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत विविध स्वयंसेवी संस्थांनी त्यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी, संस्थेच्या सदस्या डॉ. रमिलाबेन श्रॉफ यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.

या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार व गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफित सादर करण्यात आली तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘गौरव ग्रंथ’चे प्रकाशन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button