Uncategorized

जेएनपीएने स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट व इंटिग्रेटेड व्हेसल ट्रॅफिक सिस्टीमचे एकत्रीकरण
रिअल-टाइम, डेटा-आधारित सागरी संचालनास नवी दिशा

जेएनपीएने स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट व इंटिग्रेटेड व्हेसल ट्रॅफिक सिस्टीमचे एकत्रीकरण
रिअल-टाइम, डेटा-आधारित सागरी संचालनास नवी दिशा
मुंबई,(प्रतिनिधी) ७ जानेवारी २०२६ :
भारताच्या सर्वात मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) सागरी संचालनाच्या एंड-टू-एंड डिजिटलीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. जेएनपीएने स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम (HMS) आणि इंटिग्रेटेड व्हेसल ट्रॅफिक सिस्टीम (IVTS) यांचे यशस्वी एकत्रीकरण करत रिअल-टाइम, डेटा-आधारित सागरी संचालन सक्षम केले आहे.
सागरी संचालनाचे विस्तृत स्वरूप आणि डेटा सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन, जेएनपीएने मानक उपाय स्वीकारण्याऐवजी बंदरे, जलमार्ग व किनारपट्टीसाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र (NTCPWC) यांच्या सहकार्याने स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्याचा निर्णय घेतला. ही प्रणाली जहाज वेळापत्रक नियोजन, पायलटेज माहिती, संसाधन वाटप, IoT-आधारित इनपुट्स, सुरक्षितता निरीक्षण तसेच शाश्वतता मापन यांचा एकात्मिक समावेश करते. त्यामुळे जागतिक मानकांशी सुसंगत असा कार्यक्षम व पारदर्शक कार्यप्रवाह उपलब्ध झाला आहे.
यासोबतच, जेएनपीएने स्वतःची स्वतंत्र इंटिग्रेटेड व्हेसल ट्रॅफिक सिस्टीम (IVTS) कार्यान्वित केली आहे. याआधी मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून चालविण्यात येणाऱ्या वॉट्सिला-आधारित VTS सेवांवर अवलंबून राहण्याऐवजी, जेएनपीएने अधिक आधुनिक व स्वायत्त प्रणाली स्वीकारली आहे. IVTS अंतर्गत AIS-आधारित जहाज माहिती संकलन सुरू असून, प्रणाली पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर टर्मिनल ऑपरेटर व सेवा पुरवठादारांना रिअल-टाइम दृश्य उपलब्ध होणार आहे. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक जलद, अचूक व परिणामकारक ठरणार आहे.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करताना जेएनपीएचे अध्यक्ष श्री. गौरव दयाल (भा.प्र.से.) म्हणाले,
“लँडलॉर्ड पोर्ट मॉडेलच्या वातावरणात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सागरी संचालनाचे डिजिटलीकरण अत्यावश्यक आहे. स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम आणि रिअल-टाइम डेटा प्लॅटफॉर्म स्वीकारून जेएनपीए सर्व टर्मिनल ऑपरेटरसाठी सेवा अधिक सक्षम करत आहे. या बदलांचे सकारात्मक परिणाम आधीच दिसून येत असून, त्यामुळे बंदराची स्पर्धात्मक क्षमता आणखी वाढेल.”
डिजिटलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, गेल्या सहा महिन्यांपासून वापरात असलेल्या पायलट “थागवल” ॲपद्वारे आता बंदरातील सर्व जहाज हालचालींचा डेटा पूर्णतः डिजिटल स्वरूपात संकलित केला जात आहे. या ॲपमध्ये मास्टरच्या डिजिटल स्वाक्षरींसह संपूर्ण पायलटेज माहिती नोंदवली जाते, अहवाल निर्मितीची सुविधा उपलब्ध आहे, तसेच हे ॲप बंदराच्या बिलिंग प्रणाली (FOCUS) आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पोर्टल (NLP) यांच्याशी एकात्मिक करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कागदी नोंदींची पद्धत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहे.
सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून, यामध्ये टग्स, पायलट लाँचेस आणि इतर नौका यांसह सर्व लॉजिस्टिक साधनांपर्यंत डिजिटल डेटा संकलनाचा विस्तार करण्यात येत आहे.
जेएनपीएने VTS सह सर्व सागरी संचालन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोर्ट फॅसिलिटी सेंटर (PFC) येथे यशस्वीपणे स्थलांतरित केले आहे. या एकात्मिक सुविधेमध्ये सागरी संचालनाशी संबंधित सर्व विभाग, पोर्ट हेल्थ ऑफिसर कार्यालय तसेच इतर संबंधित प्राधिकरणांचा समावेश असून, ही सुविधा १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः कार्यान्वित झाली आहे.
लँडलॉर्ड पोर्ट मॉडेलनुसार कंटेनर, द्रव व बहुउद्देशीय टर्मिनल्सचे संचालन खासगी संस्थांकडून होत असले, तरी सर्व ऑपरेटरना सागरी सेवा पुरवण्याची जबाबदारी जेएनपीएकडेच आहे. बंदरात पाच कंटेनर टर्मिनल्स, दोन द्रव टर्मिनल ऑपरेटर आणि एक बहुउद्देशीय बर्थ ऑपरेटर कार्यरत असल्याने, पारदर्शक व कार्यक्षम सागरी सेवा अत्यंत आवश्यक ठरते. या गरजेला प्रतिसाद देत जेएनपीएने सागरी संचालनाचे रूपांतर रिअल-टाइम, टाइम-स्टॅम्पयुक्त डिजिटल प्रणालीमध्ये केले आहे.
जनेप प्राधिकरणाबद्दल
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जनेप) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. २६ मे १९८९ रोजी स्थापनेपासून जनेपने बल्क कार्गो टर्मिनलवरून देशातील अग्रगण्य कंटेनर बंदर म्हणून प्रगती केली आहे. सध्या येथे एनएसएफटी, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, बीएमसीटी आणि एपीएमटी असे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत.
जनेप २७७ हेक्टर क्षेत्रावर विकसित केलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रासह (SEZ) निर्यातप्रधान उद्योगांना चालना देत आहे. याशिवाय, वाधवण येथे सर्व हवामानासाठी योग्य, डीप ड्राफ्ट आणि १०० टक्के हरित असे ग्रीनफिल्ड बंदर विकसित करण्यात येत असून, ते महाराष्ट्रातील १३वे मोठे बंदर ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button