Uncategorized

वीज दरवाढीने तारापूर उद्योग संकटात; कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर.

वीज दरवाढीने तारापूर उद्योग संकटात; कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर.

महावितरणविरोधात तारापूर एमआयडीसीतील उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’.

तारापूर (प्रतिनिधी):पालघर जिल्ह्यातील बोईसर–तारापूर येथील आशिया खंडातील अग्रगण्य औद्योगिक क्षेत्र असलेल्या तारापूर एमआयडीसीमध्ये अन्यायकारक वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचा संताप उफाळून आला. महावितरण (एमएसईडीसीएल)च्या वाढीव वीज दरांविरोधात बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी उद्योगजगताने एकजूट दाखवत तीव्र आंदोलन छेडले. बोईसर–तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘हाय व्होल्ट मोर्चा’ काढत कारखानदारांनी महावितरणला अक्षरस: घेराव घातला.
तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीमा)चे अध्यक्ष डी. के. राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात १५० हून अधिक औद्योगिक युनिट्सचे मालक व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वीज दरवाढीमुळे उद्योगांचे कंबरडे मोडले असून उत्पादन खर्च प्रचंड वाढल्याने अनेक उद्योग तोट्यात जात असल्याचा आरोप यावेळी ‘टीमा’ अध्यक्ष डी. के. राऊत यांनी केला.
आंदोलनस्थळी बोलताना ‘टीमा’ अध्यक्ष डी. के. राऊत यांनी महावितरण व राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. महावितरणने सादर केलेली ‘मल्टी इयर टॅरिफ’ (एमवायटी) याचिका तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (एमईआरसी)च्या अलीकडील आदेशांमुळे उद्योग अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. वाढती वीज बिले उद्योगांसाठी असह्य ठरत असून अनेक कारखाने आधीच तोट्यात गेल्याचे श्री.राऊत यांनी स्पष्ट केले.
ही अन्यायकारक वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्यात आली नाही, तर तारापूर परिसरातील शेकडो कारखान्यांवर कायमस्वरूपी टाळे लागेल आणि हजारो कामगार बेरोजगार होतील, असा थेट इशारा श्री.राऊत यांनी दिला. ही दरवाढ केवळ उद्योगांवर आर्थिक भार टाकणारी नसून महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यालाच धोका निर्माण करणारी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. देशातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या तारापूर एमआयडीसीची सद्यस्थिती अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.परिणामी राज्यातील बेरोजगारी झपाट्याने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
टीमाचे उपाध्यक्ष पापा ठाकूर यांच्यासह अन्य वक्त्यांनी महावितरणच्या धोरणांवर जोरदार टीका केली. वीज वापर आणि विक्री वाढविण्याऐवजी केवळ दरवाढ करून महसूल वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही भूमिका सरकारच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरणाच्या पूर्णतः विरोधात असल्याचे सांगत, शेजारील राज्यांमध्ये वीज दर कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग तेथे स्थलांतरित होत असल्याची गंभीर बाबही त्यांनी अधोरेखित केली. टीमा अध्यक्ष डी. के. राऊत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात डहाणू इंडस्ट्रीज असोसिएशन तसेच लघु उद्योग भारती, बोईसर यांचाही सहभाग होता. महावितरणच्या उद्योगविरोधी धोरणांवर तात्काळ आळा घालून उद्योगांना दिलासा देण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा उद्योग बंद करणे किंवा राज्याबाहेर स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा कडक इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनाचे मागणीपत्र महावितरण पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील नागोराव भारंबे तसेच उपकार्यकारी अभियंता (बोईसर औद्योगिक) प्रभुचरण चौधरी यांना सादर करून तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी ‘टीमा’ पदाधिकारी निलेश पाटील, एस. आर. गुप्ता, उदयन सावे, एस. एल. शर्मा, राकेश पंसारी, अजित राणे, नीरज पुरोहित, रवि भावसर, अमरसिंह, सीताराम पटेल, कृष्णा देशमुख, चंद्रकांत चौधरी, तसेच लघु उद्योग भारती, बोईसरचे अध्यक्ष देवेश देशमुख, ॲड. साहिल जाधव, ॲड. कल्पेश धोडी, कामगार नेते संजय पाटील आदींसह मोठ्या संख्येने कारखानदार व प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button