Uncategorized

आमदार राजेंद्र गावितांच्या स्थानिक निधीचा ठेकेदारांकडून मनमानी गैरवापर वापर; रस्ते कामात बांधकाम विभाग झोपेत की संगनमतात

आमदार राजेंद्र गावितांच्या स्थानिक निधीचा ठेकेदारांकडून मनमानी गैरवापर वापर; रस्ते कामात बांधकाम विभाग झोपेत की संगनमतात
डहाणू /प्रसाद भालेराव
शिवसेना (शिंदे गट) पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांच्या स्थानिक आमदार निधीतून सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात मतदारसंघातील डहाणू तालुक्यामधील मुरबाड ग्रामपंचायत हद्दीत दोन विकासकामांना “यश मजूर कामगार सहकारी संस्थेस”प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या कामांमध्ये ठेकेदारांकडून मनमानी व गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.

स्थानिक आमदार निधीतून;

१)मुख्य रस्त्यापासून किशोर कुंभारे यांच्या घरापर्यंत नवीन काँक्रीट रस्ता तयार करणे,
२)मुख्य रस्त्यापासून मुरबाड आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे,
अशी दोन कामे मंजूर करण्यात आली होती.

मात्र प्रत्यक्ष पाहणीत असे आढळून आले की, नागरिकांच्या दैनंदिन रहदारीसाठी वापरात असलेला आधीच मजबूत व सुव्यवस्थित काँक्रीट रस्ता केवळ किरकोळ प्रमाणात काँक्रिटीकरण करून पूर्ण दाखवण्यात आला आहे. त्यामुळे निधीचा योग्य वापर झाला आहे का?असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

आश्रमशाळेचा रस्ता दुर्लक्षित;
धक्कादायक बाब म्हणजे सन २००६ साली सूर्यानगर वसाहतीत स्थलांतरित झालेल्या मुरबाड आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवलेच गेले नाहीत. सध्या या आश्रमशाळेत ७१७ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेला पेवर ब्लॉकचा रस्ता दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे.
त्याऐवजी ठेकेदाराने मुरबाड येथील साबीर घाची यांच्या घराकडे जाणाऱ्या, आधीच चांगल्या स्थितीतील काँक्रीट रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवून काम पूर्ण केल्याचे दाखवले आहे.गरज बाजूला,सोय पुढे त्यामुळे स्थानिक आमदार निधीचा उघड गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फलकावरील अंदाजित रक्कम गायब;
ज्या ठिकाणी काम पूर्ण झाल्याचा फलक लावण्यात आला आहे, त्या फलकावर अंदाजित खर्चाची रक्कमच नमूद नसल्याचे स्पष्ट दिसून येते. यामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव असल्याची शंका अधिक बळावली आहे.

बांधकाम विभागाची संशयास्पद भूमिका;
या संपूर्ण विकासकामांच्या काळात बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कामाकडे पाठ फिरवत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे काम कोणाच्या देखरेखीखाली आणि कोणत्या निकषांवर पूर्ण करण्यात आले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक ग्रामस्थांची चौकशीची मागणी;
या प्रकरणी स्थानिक आमदार निधीच्या वापराची सखोल चौकशी, संबंधित ठेकेदारावर कारवाई तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून,कामांचे बिल रोखण्यात आले आहे.अंतिम चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
श्री. महेंद्र किणी
कार्यकारी अभियंता.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button