Uncategorized

गुरू तेगबहादूर साहेब जी यांचा ३५० वा शहिदी समागम

विशेष लेख

गुरू तेगबहादूर साहेब जी यांचा ३५० वा शहिदी समागम

भारताच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सत्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महान विभूती श्री. गुरू तेगबहादूर साहेब जी यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या साठी राज्य शासनाने राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय तसेच जिल्हास्तरीय समिती स्थापन केली असून या समिती मार्फत उल्लेखनीय कामगिरी केली जात आहे.
या समागमातील विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम हे केवळ स्मरणोत्सव नसून, मूल्याधिष्ठित राष्ट्रनिर्मितीचा संदेश देणारे ऐतिहासिक पर्व ठरत आहेत.

मानवतेसाठी बलिदान

गुरू तेगबहादूर साहेब जी हे शीखांचे नववे गुरू. त्यांनी कोणत्याही एका धर्मासाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या अस्तित्वासाठी आपले बलिदान दिले. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या जबरदस्तीच्या धर्मांतराविरुद्ध त्यांनी निर्भीडपणे आवाज उठवला. “तिलक, जनेऊ राखण्यासाठी” त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे भारतीय संविधानात अंतर्भूत असलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या मूल्यांचे मूर्त रूप मानले जाते.

३५० वा समागम : श्रद्धा, सेवा आणि संकल्प

देश-विदेशात साजऱ्या होत असलेल्या या ३५० व्या समागमामध्ये अखंड पठण, कीर्तन, गुरबाणी विचार, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, शैक्षणिक उपक्रम, स्वच्छता मोहीम व लंगर सेवा यांसारख्या उपक्रमांद्वारे गुरूजींच्या विचारांचा सामाजिक अविष्कार घडवून आणला जात आहे. हा समागम केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्याचा उत्सव ठरत आहे.

हिंद दी चादर’ – सर्वांसाठी प्रेरणा
गुरू तेगबहादूर साहेब यांना ‘हिंद दी चादर’ असे गौरवाने संबोधले जाते. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, सत्यासाठी प्राण देण्याची आणि भीती न बाळगता मूल्यांची कास धरण्याची प्रेरणा त्यांनी दिली. आजच्या अस्थिर व तणावग्रस्त जगात त्यांच्या विचारांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते.
नव्या पिढीसाठी दिशादर्शक वारसा
३५० वा समागम हा इतिहासाची उजळणी करण्यापुरता मर्यादित नसून, नव्या पिढीला संविधानिक मूल्ये, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचा वारसा देणारा आहे. गुरू तेगबहादूर साहेब यांचा जीवनप्रवास सांगतो की, सत्तेपेक्षा सत्य मोठे असते आणि धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ असते.
गुरू तेगबहादूर साहेब जी यांचा ३५० वा शहिदी समागम म्हणजे बलिदानातून जन्मलेली मानवतेची दीपज्योत आहे. या दीपस्तंभाच्या प्रकाशात आपला देश सदैव एकता, बंधुता आणि धर्मस्वातंत्र्याचा मार्ग अविचलपणे चालवत आहे.

राहुल भालेराव
जिल्हा माहिती अधिकारी
पालघर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button