ज्ञानमाता झरी आश्रमशाळेच्या किरण नाईकची पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ज्ञानमाता झरी आश्रमशाळेच्या किरण नाईकची पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
तलासरी दि.१३ (डॉ. दत्तात्रय शिंदे)
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर पोलीस मैदानावर या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी मैदानी क्रीडा स्पर्धा निवड चाचणी मंगळवारी पार पडली.
या राज्यस्तरीय निवड चाचणीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत येणाऱ्या ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च आश्रम विद्यालय,झरी ता.तलासरी येथील कु.किरण रमेश नाईक या खेळाडू विद्यार्थ्यांने १०० मी. धावणे क्रिडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला .या कामगिरीच्या बळावर ४ बाय १००मी. या रिले प्रकारात छत्तीसगड या ठिकाणी होणाऱ्या पहिल्या आदिवासी खेलो इंडिया २०२५-२६ या राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
आश्रम शाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत वेगाचा बादशहा म्हणून ओळख असणाऱ्या किरणने आत्तापर्यंत सलग पाच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन विक्रमी अशी सात सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.
या खेळाडू विद्यार्थ्यांला क्रीडा मार्गदर्शक दिलीप राबड सर,साहिल वांगड, प्राचार्या सिस्टर बस्तियांना फर्नांडिस,मनोहर माहला व सिस्टर निर्मला बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील खेळाडू विद्यार्थ्याचे तसेच मार्गदर्शकांचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभाग डहाणूचे प्रकल्पाधिकारी विशाल खत्री (भा.प्र.से), सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल पाटील, ज्ञानमाता सदन तलासरीचे संचालक फा.निलम लोपिस,शाळासंचालक फा. सॅबी कोरिया ,शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी , शाळा व्यवस्थापन सदस्य व पालक यांनी अभिनंदन करत छत्तीसगड या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या.