मान ग्रामपंचायतीकडून सर्वांगीण विकासकामांचा आदर्श उपक्रम


मान ग्रामपंचायतीकडून सर्वांगीण विकासकामांचा आदर्श उपक्रम
मान (प्रतिनिधी)मान ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध लोकोपयोगी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ग्रामपंचायतीचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. मान ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक पाड्यात अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी व शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली स्टीलची तिरडी प्रत्येक पाड्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मान ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अंजली भावर व ग्रामपंचायत अधिकारी रमेश उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व विकासकामे राबविण्यात येत आहेत.
याचबरोबर मान ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर शासकीय सुविधा डिजिटल स्वरूपात विकसित करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत कार्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला असून, पर्यावरणपूरक व वीजबचतीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.
गावातील प्रत्येक पाड्यातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने शुद्ध जल पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षितता व प्रकाशाची सुविधा मिळावी म्हणून प्रत्येक पाड्यात सौरऊर्जेचे दिवे बसविण्यात आले आहेत.
स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डंपिंग ग्राउंडची निर्मिती करण्यात आली असून, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून संपूर्ण गाव स्वच्छ ठेवण्याचे काम ग्रामपंचायतमार्फत नियमितपणे केले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून मान ग्रामपंचायत हद्दीत वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे पाणी अडवणूक होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
या सर्व कामांमुळे मान ग्रामपंचायत परिसरात विकासाला चालना मिळाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.