विक्रमगड येथे महालक्ष्मी ज्वेलर्स चोरी प्रकरणी उघडकीस; आरोपी अटकेत, 101 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
विक्रमगड येथे महालक्ष्मी ज्वेलर्स चोरी प्रकरणी उघडकीस; आरोपी अटकेत, 101 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
विक्रमगड (प्रतिनिधी)विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले 101 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक आदिनाथ महादेव कचरे (वय 36, व्यवसाय – सराफ) यांच्या दुकानात दि. 14 जानेवारी 2026 रोजी ही घटना घडली होती. अंदाजे 35 ते 40 वयोगटातील एका अनोळखी इसमाने दुकानातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत काऊंटरमधील सुमारे 18 लाख रुपये किमतीचे 148.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून पलायन केले होते.
या प्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 02/2026 भा.न्या.सं. 2023 कलम 305 प्रमाणे दि. 15/01/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व विक्रमगड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपी मोहम्मद कलाम सलामुद्दीन अन्सारी (वय 42, रा. भिवंडी, जि. ठाणे) याला दि. 24/01/2026 रोजी अटक करण्यात आली.
अधिक तपासात आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीतील 39 सोन्याच्या टॉप्सच्या जोड्या, एकूण 101 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीस मा. न्यायालयाने दि. 30/01/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर आरोपी हा ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पालघर, मीरा-भाईंदर-वसई-विरार तसेच रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी 13 गुन्ह्यांची नोंद आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली आहे.