पालघर शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणीस्वावलंबी प्रतिष्ठान पालघरची नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी
पालघर शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी
स्वावलंबी प्रतिष्ठान पालघरची नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी
पालघर (प्रतिनिधी)पालघर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती शक्यता तसेच नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेता तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्वावलंबी प्रतिष्ठान पालघर या संघटनेने नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील चार रस्ता, SBI चौक, पालघर तीन रस्ता, पाच बत्ती परिसर यांसारख्या प्रमुख चौकांवर वाहतूक पोलीस व सिग्नल यंत्रणेचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ परिसरात ‘नो-पार्किंग झोन’ची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
पालघर शहरातील अनेक अरुंद रस्त्यांवर एकमार्गी (One Way) वाहतूक व्यवस्था लागू करणे, रस्त्यावर व फुटपाथवर अतिक्रमण करून उभारलेल्या अनधिकृत दुकाने तसेच अवैध पार्किंगवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः पालघर स्टेशन ते कचेरी रोड, पाच बत्ती ते माहीम रोड आणि देवीश रोड ते जुना पालघर या भागांमध्ये वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
रिक्षा व मॅजिक स्टँडचे शिस्तबद्ध पुनर्व्यवस्थापन करणे, फेरीवाले व हातगाड्यांमुळे होणाऱ्या वाहतुकीतील अडथळ्यांवर नियंत्रण ठेवणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी झेब्रा क्रॉसिंग कार्यान्वित करणे व फुटपाथ मोकळे ठेवणे या बाबी तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ व सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची स्वतंत्र यादी तयार करून त्या ठिकाणी विशेष उपाययोजना राबवाव्यात, तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित व तातडीची कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद आहे.
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती प्रभावीपणे राबवावी तसेच ‘हेल्मेटशिवाय पेट्रोल न देणे’ या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस व नगर परिषद यांच्यात समन्वय साधून सातत्याने पाठपुरावा करावा, अशीही ठाम मागणी स्वावलंबी प्रतिष्ठान पालघर यांनी केली आहे.
नगर परिषद प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना अमलात आणाव्यात, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.