Uncategorized

माहीम येथे रॉकी चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

माहीम येथे रॉकी चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
माहीम (पालघर):
युवासेना पालघर जिल्हा युवाअधिकारी श्री. रॉकी नारायण तांडेल यांच्या संकल्पनेतून माहीम, पालघर येथे भव्यदिव्य रॉकी चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे माहीम परिसरात क्रीडाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते.
माहीम गावात आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, दिव–दमण येथील नामवंत संघांसह केळवे, माहीम, वडराई, नारपड, दांडी आदी ग्रामीण भागातील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाचा फुटबॉल खेळ पाहण्याची तसेच त्यातून शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली.
उद्घाटन व बक्षीस समारंभ
स्पर्धेचे उद्घाटन माहीम गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. प्रीती अरुण पाटील यांच्या हस्ते पार पडले.
बक्षीस समारंभास शिवसेना सहसंपर्क प्रमुख विकास मोरे, पालघर लोकसभा निरीक्षक अजय बंधू ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख गिरीश राऊत, अनुप पाटील, नगरसेवक आरिफ कलाडिया यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी पालघर जिल्हा महिला संघटिका भावना किणी, भविका पाटील, विश्वास वळवी, उपतालुका संघटिका पद्मावती पाटील उपस्थित होत्या. तसेच पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्रजी गावित, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रदर्शनीय जयेंद्र दुबळा, भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, डहाणू नगरपरिषद उपनगराध्यक्ष जगदीशभाई राजपूत यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेस भेट दिली.
बक्षिसांचे स्वरूप
विजेत्या संघास ₹१,११,१११/- रोख व आकर्षक चषक,
उपविजेत्या संघास ₹५५,५५५/- रोख व चषक,
तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघास प्रत्येकी ₹११,१११/- रोख व चषक,
तसेच उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष पारितोषिके देण्यात आली.
अंतिम सामना अत्यंत चुरशीचा
स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाले. अंतिम सामना केळवे फुटबॉल असोसिएशन (KFA) विरुद्ध फिशरमन शिव साई एफ.सी., मुंबई यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात केळवे फुटबॉल असोसिएशनने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय नोंदवत रॉकी चषकावर आपले नाव कोरले.
जय भवानी एफ.सी., मुंबई आणि OAF FC, नवी मुंबई हे संघ संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी राहिले.
स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद
रॉकी चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन व नियोजन अत्यंत उत्कृष्ट असल्याचे मत उपस्थित मान्यवरांसह खेळाडू व प्रेक्षकांनी व्यक्त केले. या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी खेळाडूंना एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळाले असून, भविष्यातील फुटबॉलपटूंना प्रेरणा मिळाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button