कला, क्रीडा, साहित्य व संस्कृतीचा संगमपालघर येथे कुणबी महोत्सव उत्साहात संपन्न.





कला, क्रीडा, साहित्य व संस्कृतीचा संगम
पालघर येथे कुणबी महोत्सव उत्साहात संपन्न
पालघर :(प्रतिनिधी)
कला, क्रीडा, साहित्य, आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रमांचा सुरेख संगम साधणारा कुणबी महोत्सव पालघर येथील संघाच्या सभागृहात दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील सर्व वयोगटांना सहभागी करून घेणाऱ्या या महोत्सवात विविध स्पर्धा व कार्यक्रमांनी दोन दिवस परिसर चैतन्यमय झाला होता.
महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, वकृत्व, वेशभूषा, तर महिलांसाठी हळदीकुंकू व मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. यासोबतच एकांकिका, मायबोली सादरीकरण, लोकनृत्य, एकल व समूहनृत्य, तसेच क्रिकेट स्पर्धा यामुळे कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
महोत्सवाचे उद्घाटन पालघर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व समाजाचे माजी उपाध्यक्ष उत्तम मोरेश्वर घरत यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजाचे अध्यक्ष मनोज चिं. घरत, कार्याध्यक्ष गणेश भि. घरत, माजी अध्यक्ष परेश पाटील, विदुर पाटील, चंद्रकांत घरत, ज्येष्ठ नेते पांडुरंग रा. घरत यांच्यासह मान्यवर, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार मंडळ, शिक्षक विकास मंच तसेच मोठ्या संख्येने ज्ञाती बंधू-भगिनी उपस्थित होते.
“तरुणांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन उद्घाटक उत्तम घरत यांनी केले. उपप्राचार्या अपर्णा घरत यांनी समाजाभिमुख विचार मांडले.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष उत्तम मोरेश्वर घरत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेवक दिनेश शिवाजी घरत व जस्वीन मनोज घरत यांचाही सत्कार करण्यात आला.
महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू व मनोरंजनात्मक खेळ यशस्वी करण्यासाठी क्रिशिका घरत, वैजयंती घरत, जागृती घरत, प्राजक्ता घरत, रागिणी पाटील, मृणाल राऊत, पुनम पाटील, हेमांगी घरत यांनी विशेष सहकार्य केले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी समाजातील डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा आरोग्य विषयक परिसंवाद प्रा. संजय घरत व डॉ. भावना अमित घरत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच परदेशातून दृकश्राव्य माध्यमाद्वारे डॉ. सृष्टी घरत व ज्येष्ठ डॉ. बाबुलनाथ राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
याच दिवशी साहित्य चर्चा सत्र व काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले. मायबोली, भाषा व साहित्य विषयावर प्रा. संजय घरत, डॉ. शुभम पाटील, लेखक जगदीश का. घरत व लेखक सतीश न. घरत यांनी उद्बोधक विचार मांडले. या सत्राचे सूत्रसंचालन हेमश्री उ. घरत हिने केले.
क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स सरावली संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर पवनसूत नवली उपविजेता ठरला. वैयक्तिक व सांघिक बक्षिसांनी खेळाडूंना गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सरावली ग्रामपंचायत सदस्य व संघाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
महोत्सवात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, झडपोली येथील अंध व मतिमंद विद्यार्थ्यांचा ‘संगीत स्वरधारा’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
प्रसिद्ध नृत्यांगणा कु. प्रांजल प्रसन्ना घरत हिने भरतनाट्यम व लावणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. भोजन व मंडप व्यवस्थेसाठी कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. समाजातील दानशूर देणगीदारांच्या सहकार्यामुळे महोत्सव यशस्वी झाला.
कार्यक्रमाचे नियोजन कुणबी शिक्षक विकास मंच व कार्यकारिणी यांनी केले. सूत्रसंचालन चिटणीस दिपक अ. पाटील व विनीता घरत, तर आभार सहचिटणीस संतोष दा. घरत यांनी मानले.