Uncategorized

मानधन समितीतील लाभार्थ्यांचा सन्मान; पद्मश्री पुरस्कारप्राप्त तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा गौरव

मानधन समितीतील लाभार्थ्यांचा सन्मान; पद्मश्री पुरस्कारप्राप्त तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा गौरव
पालघर(प्रतिनिधी) | दि. 03 फेब्रुवारी 2026
जिल्हा परिषद पालघर, ग्राम पंचायत विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीनिमित्त मानधन योजनेतील एकूण ६५ लाभार्थी कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते.
या समितीच्या अध्यक्षस्थानी पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड होत्या. बैठकीदरम्यान समितीतील पालकमंत्री नियुक्त सदस्यांपैकी नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल भिकल्या धिंडा यांना शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या यशामुळे केवळ पालघर जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील लोककला क्षेत्राचा गौरव वाढल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीफ मसलत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील कलाकारांची दस्तऐवज पडताळणी देखील करण्यात आली. मानधन योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने व केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा, या उद्देशाने सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त भिकल्या धिंडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले,
“या समितीतीलच एक कलाकार पद्मश्रीसारखा सर्वोच्च सन्मान प्राप्त करतो, ही बाब सर्व कलाकारांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्यातूनही कोणीही अशा उंचीपर्यंत पोहोचू शकतो.”
तसेच शासनामार्फत दरमहा देण्यात येणारे पाच हजार रुपये मानधन वृद्ध साहित्यिक व कलाकारांसाठी उपयुक्त असून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार ठरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरवर्षी या समितीअंतर्गत १०० इष्टांक निश्चित करण्यात आले असून ठरावीक निकषांनुसारच पात्र कलाकारांची निवड केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मानधन समितीची बैठक, लाभार्थ्यांची दस्तऐवज पडताळणी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त कलाकाराचा गौरव अशा त्रिसूत्री कार्यक्रमामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button