एका फोनवर पोलिसांची धाव! पालघर एसपी यतीश देशमुख यांच्या तत्परतेने बेपत्ता व्यक्ती राजस्थानमधून सुखरूप परत

एका फोनवर पोलिसांची धाव! पालघर एसपी यतीश देशमुख यांच्या तत्परतेने बेपत्ता व्यक्ती राजस्थानमधून सुखरूप परत
पालघर, दि. १४ (प्रतिनिधी) : सफाळे गावातील एक व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे त्या व्यक्तीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून त्यांना सुखरूप घरी परत आणण्यात आले आहे.
माहितीनुसार, काल सकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना फोन करून मदतीची विनंती केली. सामान्य नागरिकाचा फोन असूनही त्यांनी तो तत्काळ स्वीकारत प्रकरण गांभीर्याने घेतले.
देशमुख यांनी लगेच संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत बेपत्ता व्यक्तीचा मोबाईल ट्रेस करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांचे पथक भिलाडमार्गे राजस्थानमधील खाटूश्यामपर्यंत पोहोचले आणि तेथून संबंधित व्यक्तीचा शोध लावून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.
यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला सुखरूपपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. एका सामान्य नागरिकाच्या फोनला त्वरित प्रतिसाद देत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता याबद्दल कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच संपूर्ण पोलीस पथकाचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.