Uncategorized

टेंभोडे येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रेचे आयोजन

टेंभोडे येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रेचे आयोजन
पालघर,(प्रतिनिधी )दि. १५ : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी टेंभोडे गावात गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी भव्य गुढी पाडवा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेत गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, युवक व बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ, टेंभोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदू संस्कृतीची परंपरा जपत आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सुंदर रांगोळ्यांनी सजलेली घरे, पारंपरिक वेशभूषा आणि मंगल वातावरणात ही शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.
शोभा यात्रेची सुरुवात सायंकाळी ४.३० वाजता राईस मिल येथून होणार असून वाघोबा मार्गे पूर्वेकडील मुख्य रिक्षा स्टँड मार्गे शाळेच्या पटांगणात सांगता होणार आहे. कार्यक्रमात भव्य ढोल पथकाचे सादरीकरण तसेच गावातील महिलांचे सामूहिक पारंपरिक नृत्य हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या नृत्यात सहभागी होण्यासाठी सौ. राधा जितेंद्र पामाळे, सौ. पूजा प्रकाश पाटील व सौ. उज्वला हरेश्वर पाटील यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महिलांनी शक्यतो नऊवारी किंवा काठपदराची साडी, तर पुरुषांनी धोतर-सदरा किंवा कुर्ता-पायजमा अशा पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच डोक्यावर मंगल कलश, तुळशी वृंदावन किंवा प्रतिकात्मक गुढी घेऊन सहभागी झाल्यास शोभा यात्रेची शोभा अधिक वाढेल.
बालगोपाळांनी संत, साधू, महात्मे तसेच वीरपुरुषांच्या वेशभूषेत सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. शोभा यात्रेनंतर उपस्थितांसाठी चहा-नाश्ता तसेच यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी आर्थिक सहकार्य करावे, असेही आयोजकांनी नमूद केले आहे. ऑनलाइन मदतीसाठी गुगल पे क्रमांक ९८२३४३०२८६ (श्री. जे. डी. पाटील) उपलब्ध करण्यात आला आहे.
तरी टेंभोडे परिसरातील सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुढी पाडवा शोभा यात्रेत सहभागी व्हावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ, टेंभोडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button