शिरगाव बीचवर १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान ‘पालघर सरस’ व ग्लोबल कोकण महोत्सव; सरपंच व पत्रकार परिषदेत जोरदार तयारीचा आढावा.



शिरगाव बीचवर १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान ‘पालघर सरस’ व ग्लोबल कोकण महोत्सव; सरपंच व पत्रकार परिषदेत जोरदार तयारीचा आढावा
पालघर, (प्रतिनिधी)दि. १३ फेब्रुवारी २०२६ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पालघर सरस’ विक्री व प्रदर्शन तसेच ग्लोबल कोकण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद पालघर येथे सरपंच परिषद आणि पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. हा महोत्सव १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिरगाव बीच, पालघर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव तसेच वसई-विरार महापालिका चे माजी महापौर राजीव पाटील उपस्थित होते. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१०० महिला बचत गटांचा सहभाग
‘पालघर सरस’ विक्री व प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील सुमारे १०० स्वयंसहाय्यता महिला बचत गट सहभागी होणार आहेत. हस्तकला वस्तू, गृहउपयोगी साहित्य, पारंपरिक उत्पादने आणि विविध खाद्यपदार्थांची विक्री येथे होणार आहे. ग्रामीण महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामपंचायतींना जबाबदाऱ्या निश्चित
सरपंच परिषदेत शिरगाव, सातपाटी, केळवे, माहीम, सफाळे, एडवण, बोईसर, उमरोळी, मनोर, नांदगाव आणि तारापूर ग्रामपंचायतींना महोत्सवाच्या यशासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले. प्रसिद्धी, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था व इतर आवश्यक सुविधांसाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला ठराविक जबाबदाऱ्या सोपवून त्या प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देश दिले. “ग्रामपंचायती, प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय हा महोत्सवाच्या यशाचा पाया आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांची भूमिका महत्त्वाची
पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. ‘पालघर सरस’ व ग्लोबल कोकण महोत्सवाची व्यापक प्रसिद्धी करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहन पत्रकारांना करण्यात आले. ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले.
ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव यांनी सांगितले की, “हा महोत्सव कोकणातील कला, संस्कृती, उत्पादने आणि महिला बचत गटांच्या कर्तृत्वाला व्यापक व्यासपीठ देणारा आहे. सर्व ग्रामपंचायतींनी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम भव्य करावा.”
माजी महापौर राजीव पाटील यांनीही ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
सरपंच परिषद व पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ‘पालघर सरस’ विक्री व प्रदर्शन आणि ग्लोबल कोकण महोत्सवाच्या आयोजनाला अधिक बळ मिळाले असून प्रशासन, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.