भारतामध्ये परतल्याशिवाय याचिकेवर सुनावणी नाही; विजय मल्ल्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा


भारतामध्ये परतल्याशिवाय याचिकेवर सुनावणी नाही; विजय मल्ल्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा
मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील) : फरार उद्योगपती विजय मल्ल्या भारतात परत न आल्यास त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालय यांनी दिला आहे.
मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने म्हटले की, मल्ल्या यांनी प्रथम ते भारतात परतणार की नाही हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. “तुम्हाला परत यावे लागेल. जर तुम्ही परत येऊ शकत नसाल, तर आम्ही ही याचिका ऐकू शकत नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले.
FEO कायद्याला आव्हान
मल्ल्या यांनी फरार आर्थिक गुन्हेगार (FEO) कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एक याचिका त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाविरोधात असून, दुसरी २०१८ च्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
२०१६ पासून यूकेमध्ये वास्तव्यास असलेल्या ७० वर्षीय मल्ल्यांवर भारतात फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगसह विविध गुन्ह्यांचे आरोप आहेत.
पुढील सुनावणी १८ फेब्रुवारीला
खंडपीठाने पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी ठेवत मल्ल्यांना आणखी एक संधी दिली आहे. “तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेला टाळाटाळ करत आहात, हे आम्हाला नोंदवावे लागू शकते. कार्यवाहीचा फायदा घेता येणार नाही. आम्ही याचिका फेटाळत नाही, मात्र तुम्हाला शेवटची संधी देत आहोत,” असे न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, मल्ल्या प्रकरणात भारतीय बँकांनी ब्रिटनमधील दिवाळखोरी अपीलमध्ये यश मिळवले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाकडे देशभराचे लक्ष लागले असून, मल्ल्या भारतात परतणार का याकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.