पालघरमध्ये पेसा अंतर्गत १७ संवर्गातील नियुक्त्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू


पालघरमध्ये पेसा अंतर्गत १७ संवर्गातील नियुक्त्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू
पालघर (प्रतिनिधी) :
पालघर जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांतील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासन निर्णयाला सात ते आठ दिवस उलटूनही अद्याप कोणत्याही संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली नाही, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पेसा भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी काही इतर समाजघटकांकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. शासन तसेच माननीय न्यायालयाने वेळोवेळी आदिवासी समाजाच्या बाजूने निर्णय दिले असतानाही प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
मागील वेळी मंत्रालय स्तरावरून शासन निर्णय (जीआर) निर्गमित होऊन आयुक्त स्तरावर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले होते. तरीही अधिकृत न्यायालयीन आदेश नसताना केवळ व्हॉट्सअॅप संदेशाच्या आधारे नियुक्ती प्रक्रिया थांबवण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याच प्रकारचा अन्याय पुन्हा होऊ नये, यासाठी यावेळी ठाम भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जोपर्यंत १७ संवर्गांतील सर्व पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा आदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी संघटना, पालघर जिल्हा (महाराष्ट्र राज्य) यांनी दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष सुभाष राठोड, उपाध्यक्ष सचिन दुमडा, उपाध्यक्ष रुचिका माळी, मुख्य सचिव निकेतन थोरात, सहसचिव नीता धोडी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. सुमारे १५०० हून अधिक पात्र उमेदवारांनी आपल्या हक्काच्या नियुक्तीसाठी संघटनेसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
पेसा अंतर्गत पात्र उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.