कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे पालक-शिक्षक बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा


कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे पालक-शिक्षक बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा
तलासरी (प्रतिनिधी) – आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे एस.वाय.बी.कॉम वर्गासाठी पालक-शिक्षक बैठक उत्साहात पार पडली. डॉ. मोहनभाई पटेल सभागृहात आयोजित या बैठकीला प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी प्रा. निलेश साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत करून पालक-शिक्षक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी मार्गदर्शनपर भाषणात पालकांच्या सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांचे यश, शिस्त आणि करिअर घडविण्यात पालक व शिक्षकांची भूमिका परस्परपूरक आहे. संस्थेचे उद्दिष्ट केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आहे. तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी सहाय्य उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
प्रा. निलेश साळवे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा सादर करत नियमित अभ्यास, वर्गातील सक्रिय सहभाग आणि घरातील अभ्यास पद्धतीवर पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन केले. बैठकीत विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त व वेळेचे भान या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. नियमित उपस्थितीचे महत्त्व स्पष्ट करत गैरहजेरीचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम पालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
यावेळी महाविद्यालयातील सहशैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांची माहिती देण्यात आली. सेमिनार, कार्यशाळा आणि विविध स्पर्धांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, असे नमूद करण्यात आले.
चर्चेदरम्यान पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवत दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शैक्षणिक मदत, करिअर मार्गदर्शन व कौशल्याधारित कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना मांडल्या. महाविद्यालय प्रशासनाने या सूचनांची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. शेवटी विद्यार्थिनी निकिता धांगडा यांनी आभार प्रदर्शन केले. या बैठकीमुळे पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.