बोईसर मतदारसंघात शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका ; आमदार विलास तरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास

बोईसर मतदारसंघात शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका ; आमदार विलास तरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास

ढेकाळे. (प्रतिनिधी) – बोईसर विधानसभा मतदारसंघात आमदार विलास तरे व जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्या नेतृत्वात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेशाचा जोरदार धडाका सुरू असून, ढेकाळे येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या भव्य कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांचा विश्वासाने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दरम्यान माजी आमदार अमित घोडा उपस्थित होते.
यावेळी शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त करत हलोली बोट ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश सांबरे, उपसरपंच योगेश सातवी, नवी दापचेरी ग्रामपंचायत सरपंच संदीप आरज, कोकणेर ग्रामपंचायत सरपंच सौ. मालिनी इभाड, करवाले ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रकांत दळवी, नावझे ग्रामपंचायत माजी सरपंच दिलीप जाधव, नवघर घाटीम ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना उबाठाचे विभाग प्रमुख वंदेश पाटील यांच्या सह तळेखल, उचावली, पेणंद, नांदगांव आंवढाणी ग्रुप ग्रामपंचायत मधील कार्यकर्ते, rसाखरे ग्रामपंचायत मधील बविआ व उबाठाचे शेकडो कार्यकर्ते तसेच विविध गावातील कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या अभिनंदन सोहळ्यात बोलताना नवीन प्रवेशित जनप्रतिनिधींनी सांगितले की, “आमदार विलास तरे यांच्या माध्यमातून आदिवासी विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक प्रश्न सोडविण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. लोकाभिमुख कार्यपद्धती, साधेपणा आणि विकासनिष्ठ दृष्टिकोन यातूनच आम्ही प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल झालो आहोत.” कार्यक्रमस्थळी उपस्थित आमदार विलास तरे यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “शिवसेना ही सामान्य माणसाच्या हक्काची लढाई लढणारी भूमिका ठेवते. आपल्या भागाचा विकास, आदिवासी समाजाचा प्रगतीमार्ग आणि युवकांना संधी हे आमचे ध्येय आहे. अधिकाधिक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यात सहभागी होत असल्याने आगामी निवडणुकांमध्ये आपण पालघर जिल्ह्यात भगवा झेंडा आणखी बुलंद करणार आहोत.” आजच्या प्रवेशामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, पालघर जिल्ह्यात जलदगतीने विकसित होत असलेल्या बोईसर मतदारसंघात आमदार विलास तरे यांच्या विकासकामांना वेग आला असून त्याचा थेट परिणाम म्हणून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर लोकांचा ओढा दिसून येत आहे. कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि ‘जय महाराष्ट्र!’, ‘जय भवानी – जय शिवाजी!’ घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
@ चौकट :–
पक्षात प्रवेश नसून कुटुंबात प्रवेश आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठं करा – जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण
शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) ही केवळ राजकीय संघटना नसून ती एक कुटुंब असून, यात सामील होणारा प्रत्येक कार्यकर्ता हा घरातील सदस्य असल्याची भावना जपणे हीच खरी शिवसेनेची ताकद आहे, असे प्रतिपादन शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी केले. ढेकाळे येथील आमदार विलास तरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यकर्ता स्नेहगटात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, युवा, महिला व सामाजिक बांधवांनी पार्टीचे विचार स्वीकारून पक्षाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या निमित्ताने जिल्हा प्रमुखांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, “हे फक्त पक्षप्रवेश नाही; हे आपल्या कुटुंबात सामील होणे आहे. आपण पक्षाला मोठं करायचं आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करा.” तसेच “शिवसेनेत पदापेक्षा कार्याचे मूल्य मोठे आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करा, लोकांच्या अडचणी सोडवा, त्यांच्यासोबत राहा, पद, मान-सन्मान आपोआप तुमच्या मागे येईल.” या कार्यक्रमात जिल्हा प्रमुखांनी आमदार विलास तरे यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “ढेकाळे कार्यालय हे लोकांचे घर आहे. येथे प्रत्येक नागरिकाला मान, आदर आणि समाधान मिळते. राज्यात जनसंपर्काचा आदर्श मॉडेल असला तर तो बोईसरमध्ये दिसतो.”
@ ठळक मुद्दे :
# हलोली बोटचे सरपंच व उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
# जिल्ह्यात शिवसेनेचा जनाधार वाढत असल्याचे स्पष्ट चित्र
# आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांत भगवा भक्कम करण्याचा निर्धार