डहाणू येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची वार्षिक मोबिलायझेशन ड्रिल संपन्न




डहाणू येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची वार्षिक मोबिलायझेशन ड्रिल संपन्न
डहाणू (पालघर) : आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांची वार्षिक मोबिलायझेशन ड्रिल उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सकाळी ८:४५ ते ११:०० या वेळेत आयोजित या सरावात विविध यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या ड्रिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, अग्निशमन विभाग, आपदा मित्र, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग तसेच नागरी संरक्षण दल सहभागी झाले होते. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय वाढविणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
ड्रिलदरम्यान डहाणू तालुक्यातील एका ठिकाणी आग लागल्याची काल्पनिक माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. मात्र औद्योगिक सुरक्षा विभागाने पडताळणी करताना त्या ठिकाणी रेडिएशन स्रोत असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पालघर यांना तातडीने पाचारण करण्यात आले.
यानंतर घटनास्थळी पोलीस विभागाने बंदोबस्त तैनात केला. नागरी संरक्षण दल व आपदा मित्र यांच्या मदतीने जखमींना प्रथमोपचार देण्यात आले. NDRF पथकाने रेडिएशन डोजीमीटरच्या साहाय्याने किरणोत्सर्गाचे प्रमाण तपासून तात्काळ वैयक्तिक डिकॉन्टॅमिनेशन स्टेशन उभारले व आवश्यक कार्यवाही केली.
नाशिक जिल्ह्यातील जिंदाल कंपनीतील आगीच्या घटनेच्या धर्तीवर ही ड्रिल राबविण्यात आली असून, सर्व यंत्रणांमधील समन्वय आणि तत्परता यशस्वीरीत्या तपासण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.