बोईसरमध्ये भारत-रूस सांस्कृतिक मैत्रीचा रंगोत्सव; देशभक्ती गीतांनी कार्यक्रमात भरली रंगत




बोईसरमध्ये भारत-रूस सांस्कृतिक मैत्रीचा रंगोत्सव; देशभक्ती गीतांनी कार्यक्रमात भरली रंगत
बोईसर :(प्रतिनिधी) होळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भारत-रूस सांस्कृतिक मैत्री कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांनी आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी अविस्मरणीय रंगत आणली. भारतभूमीवर रचलेल्या गीतांच्या सुरावटींनी संपूर्ण सभागृह भारावून गेले.
कार्यक्रमात रशियन कलाकारांनी “जहाँ डाल-डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा”, “हम हैं हिन्दुस्तानी”, “लंदन देखा, पेरिस देखा”, “मेरा जूता है जापानी, सर पे लाल टोपी रूसी” यांसारखी अजरामर देशभक्तीपर गीते तसेच राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे, ही गीते आपण प्रामुख्याने १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच ऐकतो; मात्र परदेशी कलाकारांनी ती इतक्या भावपूर्ण शैलीत सादर केल्याने उपस्थित प्रेक्षक भावूक झाले.
हे सर्व कलाकार ‘ओम शांती’ संस्थेशी अनेक वर्षांपासून स्वयंसेवक म्हणून जोडलेले असून, कोणताही मोबदला न घेता सेवाभावाने कार्य करीत आहेत. त्यांच्या सादरीकरणातून भारताविषयीचा आदर आणि प्रेम स्पष्टपणे जाणवले.
या कार्यक्रमामागे विराज प्रोफाइल्स (विराज इंटरनॅशनल)चे मालक श्री. नीरज कोचर यांची प्रेरणा होती. ते एकदा माउंट आबू येथे गेले असता त्यांनी अशा प्रकारचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवला. त्या वेळीच बोईसरमध्येही असा कार्यक्रम व्हावा, अशी त्यांची इच्छा निर्माण झाली. गेली ३५ वर्षे बोईसरमध्ये वास्तव्यास असल्याने, “मी या भूमीचा नागरिक आहे; आपल्या भागातही असा दर्जेदार सांस्कृतिक सोहळा व्हायला हवा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी संतोष दीदी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही बोईसरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यास तत्काळ संमती दिली. त्यानंतर ‘मामा’ यांनी आपल्या कंपनीतील तसेच विराज इंटरनॅशनलमधील सहकाऱ्यांशी चर्चा करून अवघ्या दोन दिवसांत या कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण केले.
अल्पावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला बोईसर परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत-रूस सांस्कृतिक मैत्री, देशभक्तीपर गीतांची अनोखी मेजवानी आणि सेवाभावी कलाकारांचे समर्पित सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम बोईसरकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.