चिचंणी नगरीत भव्य हिंदू महासंमेलन उत्साहात संपन्न

चिचंणी नगरीत भव्य हिंदू महासंमेलन उत्साहात संपन्न

चिंचणी (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेने नटलेली चिचंणी नगरी येथे विविध हिंदू संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त भव्य हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी गावदेवी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
पेशवेकालीन मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची दिमाखदार मिरवणूक, हिंदू नववर्ष गुढी पाडवा शोभायात्रा, दत्तजयंती, महाशिवरात्र, रामनवमी, गावदेवी यात्रा, चाचरमात उत्सव तसेच दर शनिवारी होणारी महाआरती, भजन, महाप्रसाद व सामुदायिक हनुमान चालीसा यांसारख्या धार्मिक उपक्रमांमुळे चिचंणी नगरीची ओळख अधिक दृढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित महासंमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वेदघोष करण्यात आला. केवळ सात वर्षांचे श्रीरंग दिनेश जोशी आणि सारग दिनेश जोशी यांनी वेदघोष सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी पालघर जिल्हा मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री हेरंब जोशी महाराज, वीरमाता अनुराधा गोरे (मुंबई) तसेच जव्हार येथील प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री विजय चंपानेरकर हे स्थानिक वक्ते म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी देव, देश आणि धर्मासाठी एकत्रित कार्य करण्याचे आवाहन केले.
शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महासंमेलनाची सांगता “सनातन हिंदू धर्म की जय” या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.