जमीन हस्तांतरणाविरोधात ग्रामस्थ आक्रमकपालघर तालुक्यात आंदोलनाचा इशारा

जमीन हस्तांतरणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
पालघर तालुक्यात आंदोलनाचा इशारा
बोईसर, प्रतिनिधी :
तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील कोट्यवधी रुपये मूल्य असलेल्या जमिनीचे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण झाल्याचा आरोप करत या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालघर तालुक्यातील कोलवडे गावातील शेकडो एकर जमीन एमआयडीसीने सन १९६८–७० दरम्यान औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली होती. महाराष्ट्र शासनाने कोलवडे गावातील गट क्रमांक २१० मधील जवळपास पाच एकर जागा तत्कालीन गाव कोतवाल बाबू पी. राजत यांना महार वतन म्हणून शेती कसण्यासाठी १९६४ च्या दरम्यान दिली होती. मात्र या जमिनीवर कधीही शेती करण्यात न आल्याने जमिनीचा शर्तभंग झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कोलवडे ग्रामपंचायतीने ही महार वतनाची जागा खालसा करून ती ग्रामपंचायतीस सार्वजनिक हितासाठी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी ठाणे/पालघर यांच्याकडे सन २००४ पासून वारंवार लेखी विनंती करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या अर्जांचा कोणताही विचार न करता ही जमीन परप्रांतीय नागरिकास बेकायदा हस्तांतरित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणी योग्य ती चौकशी करून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.