जागतिक महिला दिन : स्त्रीशक्तीचा गौरव आणि समानतेचा संदेश

जागतिक महिला दिन : स्त्रीशक्तीचा गौरव आणि समानतेचा संदेश
पालघर :(प्रतिनिधी) दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस समर्पित मानला जातो. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या स्त्रीची समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका असल्याने तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे आणि समान हक्कांविषयी जनजागृती करणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.
महिला दिनाची संकल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आली. १९०८ मध्ये न्यूयॉर्क येथे महिलांनी चांगल्या कामाच्या सुविधा, समान वेतन आणि मतदानाचा हक्क यासाठी आंदोलन केले. त्यानंतर १९१० मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पुढे १९७५ पासून संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ८ मार्च हा दिवस अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
आज भारतात महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, कला आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपल्या कर्तृत्वाने अनेक महिलांनी देशाचे नाव उज्ज्वल केले असून समाजाच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोठे आहे.
तथापि, आधुनिक युगात अनेक संधी उपलब्ध होत असल्या तरी काही ठिकाणी अजूनही भेदभाव, अन्याय आणि असमानता दिसून येते. त्यामुळे महिला सशक्तीकरण ही काळाची गरज ठरत आहे. शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर स्त्री स्वतःचे स्थान अधिक भक्कम करू शकते. समाजानेही महिलांकडे समानतेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
जागतिक महिला दिन हा केवळ उत्सव नसून स्त्रीच्या संघर्षाची, जिद्दीची आणि यशाची आठवण करून देणारा दिवस आहे. “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता” — ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो, तेथे देवतांचा वास असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला सन्मान, सुरक्षितता आणि समान संधी मिळाल्यासच समाजाची खरी प्रगती होईल, असा संदेश या दिनानिमित्त देण्यात येतो.
चला, या महिला दिनी स्त्रीशक्तीला सलाम करून समानतेचा आणि सन्मानाचा संदेश देऊया