जागतिक महिला दिनानिमित्त पालघर पोलिसांचे महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम
जागतिक महिला दिनानिमित्त पालघर पोलिसांचे महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम
पालघर 🙁 प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनानिमित्त पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व महिलांना शुभेच्छा देत महिलांच्या सन्मान व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे असून महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी पालघर पोलीस विविध उपक्रम राबवत आहेत. ‘पोलीस दीदी – पोलीस काका’ या उपक्रमांतर्गत २०२५ वर्षात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस व महिला वसतिगृहांमध्ये एकूण १०६९ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. तसेच रेल्वे स्थानके, बस स्थानके व गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
‘पालघर कनेक्ट’ कार्यक्रमाच्या माध्यमातून गावागावात भेटी देत सायबर सुरक्षा व महिला सुरक्षेबाबत जनजागृती केली जाते. रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर पोलिसांकडून तात्काळ कारवाई केली जाते. २०२५ मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये बलात्कार ४४, पॉक्सो अंतर्गत बलात्कार ६५, विनयभंग व छेडछाड ११४ आणि पॉक्सो अंतर्गत विनयभंग ३३ प्रकरणांची नोंद झाली असून या प्रकरणांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
महिलांच्या तक्रारींसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘महिला तक्रार निवारण कक्ष – भरोसा सेल’ स्थापन करण्यात आला आहे. महिलांना मदतीसाठी १०९१ महिला हेल्पलाईन, ११२ आपत्कालीन क्रमांक, १८१ घरगुती हिंसाचार प्रतिबंध हेल्पलाईन तसेच ८६५७२२२७७७ व ८९७६००४१११ हे २४ तास कार्यरत क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून कोणतीही अडचण असल्यास महिलांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे.