Uncategorized

भगिनी समाज विज्ञान टॅलेंट सर्च 2026 उत्साहात संपन्न

भगिनी समाज विज्ञान टॅलेंट सर्च 2026 उत्साहात संपन्न


पालघर :(प्रतिनिधी) सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि विज्ञाननिष्ठ विचारांची जडणघडण व्हावी या उद्देशाने प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेत “भगिनी समाज विज्ञान टॅलेंट सर्च 2026” या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या स्पर्धात्मक परीक्षेत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण २१९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. परीक्षेचा अभ्यासक्रम शाळेतील उपक्रमशील शिक्षक भावेश शकुंतला रमेश संखे लिखित “सफर विज्ञानाची” या पुस्तकावर तसेच विज्ञान विषयावरील सामान्य ज्ञानावर आधारित होता. विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयातील आकलन, जिज्ञासा आणि ज्ञान तपासण्यासाठी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेचे स्वरूप स्कॉलरशिप, नवोदय तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर ठेवण्यात आले होते. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, OMR शीटचा वापर आणि वेळेचे योग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती पराग वर्तन यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल तसेच शिक्षकांच्या परिश्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेतील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक भावेश शकुंतला रमेश संखे यांनी केले. त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण होण्यास मदत झाली.
दरम्यान, परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेतून निवड झालेल्या सर्वोत्तम ३० विद्यार्थ्यांना “आकाश दर्शन” (Sky Observation) करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका यांनी दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल वाढून त्यांच्या ज्ञानवृद्धीस चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून भविष्यातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थी सक्षम होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button