राज्यस्तरीय DIPEX-2026 तंत्र प्रदर्शनात आयटीआय वाणगावचे उल्लेखनीय यश



राज्यस्तरीय DIPEX-2026 तंत्र प्रदर्शनात आयटीआय वाणगावचे उल्लेखनीय यश
वाणगाव,( प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या DIPEX-2026 या राज्यस्तरीय तंत्रज्ञान प्रदर्शनात वाणगाव येथील पद्मश्री जीव्या सोमा म्हशे आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला आयटीआय विभागात रनर-अप पुरस्कार मिळाला.
संस्थेचे विद्यार्थी रुपेश मोहन वनगा आणि हर्षद रमेश माच्छी यांनी प्रोजेक्ट गाईड प्रशांत आप्पासाहेब वडर यांच्या मार्गदर्शनाखाली “Smart World of Automation for Magnificent India (SWAMI) & रोबोट वाण-ई” हा कार्यरत प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाला इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इलेक्ट्रॉनिक्स, एआय आणि आयओटी या विभागात विशेष दाद मिळाली. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांना Certificate of Excellence देऊन सन्मानित करण्यात आले.
५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी परिसरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स, IoT आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयांवरील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प या प्रदर्शनात सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या SWAMI मॉडेलमधून भविष्यातील स्मार्ट आणि स्वयंचलित भारताची संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली.
प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनीष जोशी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. करभारी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अभाविपचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री देवदत्त जोशी, सृजनचे अध्यक्ष रामचंद्र भोगले, स्वागत समिती सहसचिव प्रवीण घुगे, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश जायभाये, देवगिरी प्रदेश तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य संयोजक हरजिंदर सिंग तसेच महानगर मंत्री चिन्मय महाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
आयटीआय वाणगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संस्थेचे तसेच परिसराचे नाव राज्यभरात उज्ज्वल झाले असून विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.