पालघरात ‘गोवर्धन स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन

पालघरात ‘गोवर्धन स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन
पालघर :(प्रतिनिधी )भारतीय सात्विक आहारसंस्कृती, सेंद्रिय शेती आणि आध्यात्मिक मूल्यांवर आधारित पाककलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या ‘गोवर्धन स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स इन्स्टिट्यूट’ या नव्या शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन गोवर्धन इकोव्हिलेज, गालतेरे येथे उत्साहात पार पडले. या उपक्रमासाठी सिम्बायोसिस स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स अँड न्यूट्रिशनल सायन्सेस, पुणे यांचे शैक्षणिक सहकार्य लाभले आहे. उद्घाटनानंतर पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला परमपूज्य एच.एच. राधानाथ स्वामीजी, श्री गोरंग दास प्रभुजी, उद्योजक डॅनी वाघवानी आणि ईशिता वाघवानी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला आध्यात्मिक आणि शैक्षणिक अधोरेखा लाभली.
मान्यवरांनी यावेळी बोलताना भारतीय परंपरेतील ‘पत्रं, पुष्पं, फलं, तोयं’ या भगवद्गीतेतील तत्त्वाचा उल्लेख करत अन्न हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ते समर्पण, शुद्धता आणि कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. इस्कॉन परंपरेत भगवानाला नैवेद्य अर्पण करून प्रसाद स्वरूपात अन्नवितरण करण्याची हजारो वर्षांची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. १९७० च्या दशकात ‘गोविंदा’ रेस्टॉरंट्सच्या माध्यमातून सात्विक भोजनाची संकल्पना व्यापक स्तरावर रुजली, असेही त्यांनी सांगितले.
नव्या संस्थेमध्ये नऊ महिन्यांचा सात्विक पाककला पदविका अभ्यासक्रम तसेच सहा महिन्यांचा बेकरी व पेस्ट्री कौशल्यविकास अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यात सहा महिने संस्थेत प्रशिक्षण आणि तीन महिने औद्योगिक प्रशिक्षण असा अभ्यासक्रमाचा आराखडा असेल. अन्नपदार्थांची शुद्धता, स्वच्छता, तापमान नियंत्रण आणि वैज्ञानिक पद्धती यावर विशेष भर देण्यात येणार असून कांदा-लसूण विरहित सात्विक पाककलेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वनस्पती-आधारित आहारामुळे पर्यावरणसंवर्धन, जलसंपत्तीची बचत आणि आरोग्यवर्धन साध्य होते, असे मतही मान्यवरांनी व्यक्त केले. भारतीय अन्नपरंपरेचे दस्तऐवजीकरण करून नव्या पिढीला कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.