Uncategorized

ग्रासरूट इनोव्हेशनचे जनक पद्मश्री डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

ग्रासरूट इनोव्हेशनचे जनक पद्मश्री डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार सन २०२५ साठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथील प्राध्यापक पद्मश्री डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना जाहीर करण्यात आला आहे. ग्रासरूट इनोव्हेशनच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील नवकल्पना शोधून त्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या कार्यामुळे गुप्ता यांची देशभर विशेष ओळख निर्माण झाली आहे. हनी बी नेटवर्क या उपक्रमाचे संस्थापक म्हणून त्यांनी तळागाळातील नवोन्मेषकांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या प्रयत्नांमुळे अनेक स्थानिक कल्पना आणि संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये तसेच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा सन्मान दरवर्षी प्रदान केला जातो.
यंदाचा पुरस्कार समारंभ यशवंतराव चव्हाण यांच्या ११३व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुंबई येथील चव्हाण सेंटर येथे कार्यक्रम होणार आहे. सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केले आहे. या संदर्भातील माहिती सरचिटणीस हेमंत टकले यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button