Uncategorized

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालये

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालये

पालघर, (प्रतिनिधी)दि. १७ मार्च : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपत आल्याने तसेच नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे वाढता कल लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दस्तनोंदणीचे वाढते प्रमाण आणि महसुली उद्दिष्टपूर्तीस गती देण्यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार दि. २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये नियमित कार्यालयीन वेळेत कार्यरत राहणार आहेत.
यामध्ये वसई क्र. १ ते ६, तसेच पालघर क्र. १ व २, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा येथील कार्यालयांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता खरेदी-विक्रीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच, ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार-रविवार व्यतिरिक्त इतर दिवशी असते, त्या कार्यालयांनी आपल्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस कार्यरत ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कामकाजावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी सह जिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयेही या दिवसांत सुरू राहणार आहेत. मुद्रांक शुल्क, अभिनिर्णय आदी प्रलंबित बाबी वेळेत पूर्ण करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button