Uncategorized

भोपोली ग्रामपंचायतीत ‘जल महोत्सव’चे आयोजन; पाणी व्यवस्थापनासाठी जनसहभागाला चालना

भोपोली ग्रामपंचायतीत ‘जल महोत्सव’चे आयोजन; पाणी व्यवस्थापनासाठी जनसहभागाला चालना


पालघर, दि. १७ (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत असून, तो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या उपक्रमांतर्गत १८ मार्च रोजी विक्रमगड तालुक्यातील भोपोली ग्रामपंचायतीत ‘जल महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेऊन प्रत्येक घराला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. याशिवाय शाळा, अंगणवाडी, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांनाही या योजनेद्वारे नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.
‘जल महोत्सवा’त जलदिंडी, ग्रामसभा तसेच विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजनेच्या विविध घटकांचे पूजन, एफटीके (Field Test Kit) द्वारे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, योजनेची तांत्रिक माहिती नागरिकांना देणे तसेच भविष्यातील देखभाल व संचालनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी नागरिकांनी आपल्या गावातील जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पाणी व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद पालघर मार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button