सामाजिक वर्तन बदलासाठी राज्य-सीआयएफएफ करार; आरोग्य सेवांना नवे बळ


सामाजिक वर्तन बदलासाठी राज्य-सीआयएफएफ करार; आरोग्य सेवांना नवे बळ
मुंबई, (प्रतिनिधी)दि. २१ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी सामाजिक व वर्तन बदल उपक्रमांना गती देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF), युनायटेड किंगडमसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा करार साकार झाला असून, आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार आहे.
या करारावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, उपसचिव चंद्रकांत विभुते, तसेच CIFF चे प्रतिनिधी डॉ. हेमांग शाह आणि डॉ. अस्मिता जैन यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आयपीआयचे राघवेश राजन आणि अविधा हेही यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे सामाजिक वर्तन बदल उपक्रम अधिक नाविन्यपूर्ण आणि संशोधनाधारित पद्धतीने राबवता येतील. समुदाय सहभाग, प्रभावी संवाद आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य, पोषण, लसीकरण, स्वच्छता आणि रोग प्रतिबंध यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जनजागृती वाढवली जाणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागांतील वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा आणि संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
CIFF कडून तांत्रिक आणि धोरणात्मक सहकार्य मिळाल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या करारामुळे दीर्घकालीन सामाजिक बदल घडवून आणत नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सकारात्मक सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मते, हा करार राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, प्रभावी संप्रेषण आणि वर्तन बदलाच्या माध्यमातून अधिक चांगले आरोग्य परिणाम साध्य करण्यास मदत होणार आहे.