सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात रोटरी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन


सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात रोटरी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
पालघर (प्रतिनिधी)
शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देणे हे सामाजिक संस्थांचे आद्य कर्तव्य आहे, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आत्तापर्यंत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र हे एक रोपटं आहे. त्याचं जतन संवर्धन सोनोपंत दांडेकर संस्थेने करावं असे प्रतिपादन प्रमुख अतिथी बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता यांनी केले. पालघर परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन करावे याकरता दांडेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि रोटरी क्लब पालघर यांच्या पुढाकाराने जवळपास सत्तर लाख रकमेचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. केंद्रामार्फत विविध क्षेत्राशी संबंधित असलेल्या स्पर्धा परीक्षांची माहिती आणि त्यांचा अभ्यास कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाईल.
पालघर रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय महाजन यांनी आपल्या स्वप्नातील उपक्रम प्रत्यक्षात येण्याचा आनंद व्यक्त केला. या उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दोन्ही क्लबचे आभार मानत रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. रोटेरेरीयन भगवान पाटील यांनी रोटरी क्लबच्या जागतिक स्तरावरच्या कामाचा परिचय उपस्थितांना करून दिला. अध्यक्षीय समारोपात सीए सचिन कोरे यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, शिक्षणासाठी लागणा-या उणिवा भरून काढण्यासाठी केलेली आर्थिक मदत जराही वाया जाऊ देणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.
साई सर्विस प्रायव्हेट लिमिटेड, प्रज्ञा मेहता अँड फॅमिली, इन्फ्लूक्स हेल्थटेक लिमिटेडचे, आक्री ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड, गुफिक ग्रुप, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट क्रिकेट टीम, सुमंत नाईक अँड फॅमिली, जस्मा इंजिनिअरिंग लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, साची भाटिया अँड मालविका पॉल या उद्योग समुहाने सदर प्रशिक्षण केंद्रासाठी भरीव आर्थिक सहकार्य केले. या समारंभास सुकेतू जरीवाला, नीता भाटीया, डॉ. मुनीर चांदीवाला, धीरज मेहता, सुमन नायर, कानिर भाटिया, महेश कोठारी, धृती शाह, सागर घरत उपाध्यक्ष मा. श्री. सुधीर दांडेकर, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी, अनिल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख आणि डॉ. तानाजी पोळ यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा.विवेक कुडू यांनी मानले.