आरोग्य, शिक्षण व महिला-बालविकास कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान



आरोग्य, शिक्षण व महिला-बालविकास कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान

पालघर(प्रतिनिधी), दि. 29 मार्च 2026 : जिल्हा परिषद पालघरमार्फत गोवर्धन इको व्हिलेज, गालतरे येथे आरोग्य, एक शिक्षण व महिला-बालविकास विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात पार पडला. विविध संवर्गातील आशा कार्यकर्त्या, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभागातून प्रत्येक तालुक्यातील एक अशा आठ जणांना पुरस्कार देण्यात आले, तसेच राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महिला व बालविकास विभागांतर्गत विविध प्रकल्पांतील सेविका व मदतनीस, तर आरोग्य विभागांतर्गत आशा कर्मचाऱ्यांना जिल्हा व तालुका स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कारांतर्गतही अनेक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मनोज रानडे यांनी शिक्षक, आशा व अंगणवाडी सेविका यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या योगदानामुळेच जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले. रवींद्र शिंदे यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागीय समन्वय आवश्यक असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेण्यात आली. या सोहळ्यास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते.