कार्ला गड ‘आई एकविरा’च्या जयघोषाने दुमदुमला; चैत्र सप्तमीला भव्य पालखी सोहळा

कार्ला गड ‘आई एकविरा’च्या जयघोषाने दुमदुमला; चैत्र सप्तमीला भव्य पालखी सोहळा
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
लोणावळा येथील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा देवीच्या मानाच्या पालखी सोहळ्याने यंदा पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाची अनुभूती दिली. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी चैत्र शुद्ध सप्तमी (दि. 25) रोजी सायंकाळी 5.30 वाजता भव्य पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
“आई माऊलीचा उदो उदो”, “आई आयलो” अशा गजरांनी संपूर्ण कार्ला गड दुमदुमून गेला होता. कोळी, आग्री, सीकेपी, सोनार आदी विविध समाजांची कुलस्वामिनी असलेल्या आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट, पोलिस प्रशासन व तालुका प्रशासन यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. कडक पोलिस बंदोबस्तात पार पडलेल्या या सोहळ्यात पालखीचे मानकरी चौल, आग्राव, ठाणेकर व पेणकर यांनी पालखीला खांदा देत “आई राजा उदो… उदो”चा जयघोष केला.
गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात पालखी मिरवणूक पार पडली. या सोहळ्याचे याची देही याची डोळा दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या वेळी मुंबईचे पत्रकार श्री. सतिश विष्णू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आई एकविरा देवी ट्रस्ट आणि भक्त श्री. अमर पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक पालख्या चैत्र शुद्ध सप्तमीला पायी चालत कार्ला गडावर दाखल झाल्या आणि भक्ती, परंपरा व उत्साह यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
🙏 आई माऊलीचा उदोउदो!