प्रशासनाचे आदेश धाब्यावर! महालक्ष्मी यात्रेत लाकडी ओंडक्यांवर उभे आकाश पाळणे. प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष; तकलादू आधारावर उभे राहत आहेत धोकादायक मनोरंजनाचे खेळ

प्रशासनाचे आदेश धाब्यावर! महालक्ष्मी यात्रेत लाकडी ओंडक्यांवर उभे आकाश पाळणे. प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष; तकलादू आधारावर उभे राहत आहेत धोकादायक मनोरंजनाचे खेळ
डहाणू/प्रसाद भालेराव
पालघर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध महालक्ष्मी देवी यात्रेला २ एप्रिलपासून सुरुवात होत असून, यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचे कडक निर्देश दिले असतानाही यात्रास्थळी आकाश पाळणे, मौत का कुवा, टोरा-टोरा, ड्रॅगन, ब्रेक डान्स यांसारख्या धोकादायक मनोरंजनाच्या खेळांची तकलादू पद्धतीने उभारणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भाविकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रासह गुजरातमधून मोठ्या संख्येने भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत १५०० ते २००० लहान-मोठी दुकाने उभारली जाणार असून, विविध खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू, खेळणी, कपडे, मिठाई, थंडपेय, सुकी मासळी आदींची मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे. त्यामुळे यात्रेत प्रचंड गर्दी होणार हे निश्चित मानले जात आहे.याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर यात्रास्थळी उभारल्या जाणाऱ्या मनोरंजनाच्या खेळांबाबत १८ मार्च रोजी प्रशासनाने घेतलेल्या आढावा बैठकीत संबंधित मालकांना सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे कडक निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काही आकाश पाळण्यांचे ढांचे मोजक्या लाकडी ओंडक्यांच्या आधारावर उभे केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रचनांची स्थिरता आणि सुरक्षितता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, हा परिसर भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो आणि तालुक्यात वेळोवेळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असतात. अशा परिस्थितीत अशा प्रकारे तकलादू पद्धतीने उभारलेले आकाश पाळणे किंवा इतर यांत्रिक खेळ कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यात्रेदरम्यान येथे हजारो भाविक, महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली, तर तिचे परिणाम अत्यंत भीषण ठरू शकतात.
दरम्यान, अशा दुर्घटनेचे उदाहरणही ताजे आहे. गेल्या वर्षी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील बिल्लीमोरा येथे सोमनाथ यात्रेदरम्यान इम्रान पटेल यांच्या मालकीच्या आकाश पाळण्यात तांत्रिक बिघाड होऊन काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत एका यंत्रचालकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर ९ भाविक गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे महालक्ष्मी यात्रेतील सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून सर्व यांत्रिक खेळांची तांत्रिक तपासणी, स्थिरता प्रमाणपत्र आणि परवान्यांची पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
भाविकांच्या श्रद्धेचा उत्सव असलेली महालक्ष्मी यात्रा ही दुर्लक्ष, बेपर्वाई आणि नफेखोरीमुळे दुर्घटनेचे केंद्र ठरू नये, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि भाविकांतून उमटत आहे.
•आकाश पाळणे मालकांचे अर्ज आले असून त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र अथवा ना हरकत दाखला देण्यात आलेला नाही.
श्री.दिक्षित
उपअभियंता, बांधकाम (अभियांत्रिकी) विभाग ठाणे
•आमचा कार्यालयाकडून महालक्ष्मी यात्रे संदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र अथवा ना हरकत दाखल्याची आवश्यकता भासत नाही.
श्री. सुनील कोळी
तहसीलदार डहाणू
- मी सध्या या भागात नवीन असल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन यात्रा स्थळ परिसरातील योग्य ती माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल.
सौ. सरला टेकाम
महसूल मंडळ अधिकारी कासा