Uncategorized

पालघरमध्ये ग्रामविकासाला नवा वेग; ११२८ बंधाऱ्यांच्या यशासह आदर्श कार्यकर्त्यांचा गौरव

पालघरमध्ये ग्रामविकासाला नवा वेग; ११२८ बंधाऱ्यांच्या यशासह आदर्श कार्यकर्त्यांचा गौरव


पालघर (प्रतिनिधी)
पालघर जिल्ह्यातील ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला नवसंजीवनी देणारा एक प्रेरणादायी सोहळा आज जिल्हा परिषदेत पार पडला. पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी आणि वनराई पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जननायक बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रशासन आणि ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात आमदार राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या नियोजनातून हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
वनराई उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी किमान पाच बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी हे लक्ष्य ओलांडत उल्लेखनीय कामगिरी केली. चहाडे ग्रामपंचायतीने तब्बल १५ बंधारे उभारून अव्वल स्थान पटकावले, तर भाताणे, आडणे आणि बऱ्हाणपूर ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १२ बंधाऱ्यांची उभारणी करून आपली छाप उमटवली. एकूण ३८ ग्रामपंचायतींना या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
यावेळी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेले आदर्श ग्रामसेवक (२०२२-२३, २०२३-२४) आणि आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (२०२४-२५) पुरस्कार वितरित करण्यात आल्याने संबंधितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाने “मोठ्या भावाच्या भूमिकेत” राहून सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून काम करावे, असे आवाहन केले. जात, धर्म किंवा राजकीय भेद न पाहता प्रत्येकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. वनराईसारख्या उपक्रमांमुळे जलसंधारणाला चालना मिळून ग्रामीण भाग अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार राजेंद्र गावित यांनी ग्रामविकासासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यावश्यक असल्याचे सांगितले, तर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शाश्वत विकासासाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वनराई उपक्रमात १००० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ११२८ बंधारे पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच ‘निपुण पालघर’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या साक्षरता आणि संख्याज्ञान वृद्धीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी सादर केला.
कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचा सेवेनिवृत्ती निमित्त विशेष सत्कार करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ प्रदान करण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button