Uncategorized

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत लक्ष्मण सातपुते यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मार्च २०२६ मधील तितिक्षा मासिक काव्यसंध्या अंतर्गत “तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार वितरण सोहळा” पावसाच्या हृद्य सरींसह भारत इतिहास संशोधक मंडळात अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. साहित्य, कला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सातपुते परिवारातील आप्तेष्ट मोठ्या अगत्याने उपस्थित होते. दशकपूर्तीनंतर भरलेल्या या विशेष संमेलनाने मराठी भाषा, संस्कृती आणि विविध कलाप्रकारांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
पुरस्कारांमुळे लेखकांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच मराठी आणि भारतीय भाषांतील साहित्याचा दर्जा उंचावण्यास मदत होते, अशी भूमिका तितिक्षा संस्थेच्या संस्थापिका प्रिया दामले यांनी आपल्या वेधक आणि नेमक्या प्रास्ताविकातून मांडली. साहित्य आणि कला क्षेत्रातील योगदानाला कोणताही दिखावा न करता निस्वार्थपणे प्रोत्साहन देणे, तसेच कल्पक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात तितिक्षा संस्था अग्रेसर असल्याचे त्यांनी नमूद केले. लेखनकलेतील उत्कृष्टतेला हक्काचे व्यासपीठ तितिक्षाने उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यशवंत पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात “गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताने झाली. दरमहा होणाऱ्या तितिक्षा काव्य-कला संध्या उपक्रमात “तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार” दिला जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
सरकारी नोकरी सांभाळून वाचनसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या स्व. यशवंत लक्ष्मण सातपुते यांच्या २६ व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय पुरातत्त्वविद आणि मंदिर वास्तुकलेचे गाढे अभ्यासक मा. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते मा. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक, वक्ते आणि संघटनकुशल व्याख्याते यांना मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रिया दामले यांनी केले, तर लेखन विजय सातपुते यांनी केले.
या सोहळ्यास मा. प्रा. जयंत विनायक खेडकर, निवृत्त प्राध्यापक, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, मा. विठ्ठल मुरकेवार, निवृत्त असिस्टंट डायरेक्टर, बी. एस. एन. एल., भारत सरकार, मा. सुजित दातार, सोल्यूशन माईंडचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रीमती भाग्यश्री यशवंत सातपुते, आदर्श माता व व्यासंगी रसिक, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मा. प्रा. जयंत विनायक खेडकर यांनी “आमचे बाळासाहेब” या विषयावर स्व. यशवंत लक्ष्मण सातपुते यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभावी आढावा घेतला. मा. पांडुरंग बलकवडे यांनी पुरस्काराची महती आणि त्याची सर्वांगीण व्याप्ती आपल्या जीवनप्रवासाशी जोडून व्यक्त केली. ध्येय, चिकाटी, चिंतन, मनन आणि सातत्य यांचे प्रासादिक स्वरूप असलेला हा पुरस्कार आपण आपल्या गुरूंना समर्पित करत असल्याचे सांगत त्यांनी तितिक्षा परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
मा. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, एकाग्रता, नम्रता, नेतृत्व, सकारात्मक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता हे गुणच व्यक्तीला पुरस्कारांपर्यंत पोहोचवतात, असे स्पष्ट केले. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक विचार, जबाबदारीची जाणीव, वेळेचे भान आणि इतरांविषयी आदर या गुणांचा विशेष उल्लेख त्यांनी केला. तितिक्षा संस्थेच्या कार्याचा आणि सत्कारमूर्तींच्या योगदानाचा त्यांनी यथोचित गौरव केला.
सर्जनशीलता, नाविन्य, नेतृत्व, आत्मविश्वास, एकाग्रता, वेळेचे पालन, नम्रता आणि समाजकारण या मूल्यांना प्राधान्य देत आज अनोखा इतिहास रचला गेला, असे मत मा. सुजित दातार यांनी व्यक्त केले.
उत्तरार्धात तितिक्षा परिवारातील कवी-कवयित्रींचे मासिक कविसंमेलन “वडिलांवरच्या कविता” या विषयांवर रंगले. रविंद्र गाडगीळ, विद्या सराफ, निला चित्रे, बाबा ठाकूर शिवाजी उराडे, दीपा राणी गोसावी, श्रीवल्लभ असावा, नंदकिशोर गावडे, संजय माने, प्रिया दामले आणि विजय सातपुते हे संमेलनाचे मानकरी ठरले. “पावसाच्या सरीसम मुला आलो तुझ्यासाठी, जरा कोरडा होऊन पुन्हा बीज माझ्यासाठी” या संवेदनशील ओळींनी कविराज विजय यशवंत सातपुते यांनी भावपूर्ण आणि बहारदार सूत्रसंचालन केले. श्रीमती भाग्यश्री यशवंत सातपुते यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. “वाहतो ही दुर्वांची जुडी” या स्वगताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. एम. अजया, गौरव पुंडे आणि भालचंद्र शिर्के यांनी संयोजनात सहकार्य केले. उपस्थित दर्दी रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “शो मस्ट गो ऑन”चा संदेश दिला आणि ही काव्यसंध्या संस्मरणीय तसेच ऐतिहासिक स्वरूपात यशस्वी ठरवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button