सुधीर दांडेकर यांची सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या उपाध्यक्षपदी निवड

सुधीर दांडेकर यांची सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या उपाध्यक्षपदी निवड
पालघर (प्रतिनिधी)सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे जेष्ठ सदस्य श्री. सुधीर दांडेकर तथा रामकृष्ण गोविंद दांडेकर यांचे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. सुधीर दांडेकर हे पालघर मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून शिक्षणतज्ञ, लेखक, विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. पालघरच्या रोटरी क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीला भरीव देणगी दिलेली आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर यांचा भव्य पुतळा आदर्श रूपामध्ये विद्यार्थी व शिक्षकांसमोर असावा ही संकल्पना मांडली व त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून देणगी गोळा करून महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये पुतळा उभारणी करण्यात त्यांचे मोठे श्रेय आहे. याव्यतिरिक्त विधी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी ॲड. प्रकाश करंदीकर कुटुंबीयांकडून मोठी देणगी मिळवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे.
सुधीर दांडेकर यांनी ‘आप्पासाहेब दांडेकर स्मृती व्याख्यानमाला’ सुरू करून पालघर वासियांसाठी वैचारिक व्यासपीठ उभे केले. ‘अक्षरवेध’ ही साहित्य संस्था व ‘पुस्तकमित्र मंडळाची’ स्थापना करून पालघरमध्ये साहित्य चळवळ सुरू केली. महाविद्यालयात नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन शैक्षणिक प्रकल्प देणे व अभिनव उपक्रम राबविणे यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘संस्थेच्या व महाविद्यालयाच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या व शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभाग असलेल्या सुधीरभाऊंची दांडेकर शिक्षण मंडळीच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.’ अशी प्रतिक्रिया सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए. सचिन कोरे यांनी व्यक्त केली आहे.