Uncategorized

सायकल नव्हे, प्रगतीची चाके

सायकल नव्हे, प्रगतीची चाके


मनोर, ता. पालघर (प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कोसबाड (केंद्र नांदगाव) येथे चिंगारी शक्ती फाउंडेशन, मुंबई आणि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स तियारा यांच्या संयुक्त विद्यमाने २० गरजवंत मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून दूरवरून पायी शाळेत येणाऱ्या मुलींना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती मिळणार आहे.
कार्यक्रमाला चिंगारी शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक व सीईओ पिंकी राजगरिया, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स तियारा यांच्या अध्यक्षा गोपिका दोशी, दीपक वाधवा, केंद्रप्रमुख जितेंद्र ढोले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक गवळी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पिंकी राजगरिया यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, “मुलींनी शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान भक्कम करावे आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. शिक्षणामुळेच राष्ट्रनिर्मिती आणि उज्ज्वल भविष्य शक्य आहे,” असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात गोपिका दोशी यांनी शाळेचे विविध उपक्रम व विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांचे कौतुक करत, “मुलींनी शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी बनावे. त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव मदतीस तयार आहोत,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जया सुतार यांनी तर आभार प्रदर्शन समिधा पाटील यांनी केले.
पूर्वी लांब अंतर पायी चालत शाळेत येणाऱ्या मुलींची उपस्थिती कमी होत होती. मात्र सायकली मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. या उपक्रमामुळे शालेय उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी नमूद करत देणगीदारांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button