Uncategorized

समिधा पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

समिधा पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


मनोर (प्रतिनिधी):
जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर, कोसबाड येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. समिधा संजय पाटील यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे ध्येय एज्युकेशन अकॅडमी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. आय. एम. विनर स्कॉलरशिप, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळा विकास, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन, भौतिक सुविधा उभारणी करून शाळेला आयएसओ दर्जा मिळवून देणे, कला-क्रीडा व विज्ञान प्रदर्शनात सहभाग, नवभारत साक्षरता अभियानातील जिल्हास्तरीय सहभाग, तसेच विद्यार्थी ऑलिम्पियाड स्पर्धांतील यश या सर्व क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
तसेच टाटा ज्योती फेलोशिप प्राप्त करून विविध प्रशिक्षणांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले असून, उत्कृष्ट अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. यापूर्वीही पंचायत समिती वाडा तसेच बी. द चेंज फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
दरवर्षी स्वतःच्या खर्चाने पाच शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे हे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
पुरस्कार स्वीकारताना सौ. पाटील यांनी हा सन्मान विद्यार्थ्यांचे, सहकाऱ्यांचे आणि शाळेच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ असल्याचे नमूद केले. या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली असून भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या दिमाखदार सोहळ्यास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीसाठी प्रसिद्ध दत्तात्रय वारे गुरुजी, ध्येय फाउंडेशनचे अध्यक्ष सुदाम शेंडगे, पुणे येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब कारेकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर बाबर मॅडम, आमदार गोरखे तसेच उपजिल्हाधिकारी पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात राज्यभरातील उत्कृष्ट व ध्येयवेड्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला असून, सौ. समिधा पाटील यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button