मुंबई वैद्य सभा द्वारा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न”




मुंबई वैद्य सभा द्वारा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न”.
१० नोव्हेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) मुंबईतील आयुर्वेदिक वैद्यांच्या सभेला ” मुंबई आयुर्वेद वैद्य सभा” असे संबोधले जाते. हे आयुर्वेदिक डॉक्टरांचे एक व्यासपीठ आहे. सभा म्हणजे संस्था किंवा संघटना. जी आयुर्वेदीक डॉक्टरांना एकत्र आणण्याचे कार्य करीत आहे. यामध्ये आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी शाखा कार्यरत आहेत. आयुर्वेदीक उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वैद्य संबोधले जाते.
अनेक वर्षांपासून, मुंबई वैद्य सभा आयुर्वेदिक जगातील नामांषकित चिकित्सकांना सन्मानित करण्यासाठी धन्वंतरी पुरस्कार प्रदान करत आहे. यावर्षी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी विले-पार्ले – मुंबई येथील हॉटेल पार्ले इंटरनॅशनल येथे हा समारंभ मान्यवर यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.
हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे संचालक डॉ. ओमप्रकाश दुबे आणि विशेष अतिथी धूतपापेश्वर लिमिटेडचे एम.डी. रणजीत पुराणिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, डॉ. साक्षी घोलप आणि डॉ. तनुजा सुरनार यांनी धन्वंतरी स्तोत्र गायन करून समारंभाची सुरुवात करण्यात आली.
या वर्षीचा सन २०२५ चा धन्वंतरी पुरस्कार डॉ. आल्हाद परांजपे आणि डॉ. विनोद मेहता यांना तर जीवनगौरव पुरस्कार डॉ. सुभाष जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वर्षी मुंबई विभागातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांमधील अंतिम वर्ष बीएएमएस मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना (टॉपर्स) प्रमाणपत्रे आणि अकरा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देऊन मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री. धूतपापेश्वर आयुर्वेद विद्यालय समितीने पूर्ण सहकार्य केले. व डॉ. श्री किरण किणी यांनी समितीच्या उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली.
पुरस्कार विजेते डॉ. परांजपे, डॉ. मेहता आणि डॉ. जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अनुभव सांगितले, जे नवीन पिढीसाठी मौल्यवान मार्गदर्शन म्हणून ठरतील .डॉ. विनोद मेहता यांनी नवीन पिढीला नेहमीच पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. सर्व पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत शाल, नारळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई वैद्य सभेचे अध्यक्ष डॉ. श्री श्यामसुंदर शर्मा यांनी आपल्या स्वागत भाषणात, आयुर्वेदाचे सिद्धांत,रुग्ण प्रकृती आणि दोषांवर आधारित रुग्णांवर चिकित्सा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि आयुर्वेदिक औषध प्रणालीचा अधिक प्रचार करण्याचे आवाहन केले. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. श्री राजेंद्र शर्मा यांनी गेल्या काही वर्षांत संस्थेने केलेल्या विविध कामगिरीवर प्रकाश टाकला आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर या समारंभाचे अध्यक्ष डॉ. दुबे यांनी मुंबई वैद्य सभेच्या १३६ व्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरासह सर्वांचे हार्दिक अभिनंदनकरी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्याला संस्थेकडून पुरस्कृत करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. आयुर्वेद क्षेत्रात इतक्या वर्षांपासून आपले स्थान टिकवून ठेवणे म्हणजे अशक्य ते शक्य करण्यासारखे आहे असे त्यांनी सांगितले. व म्हणाले जेव्हा स्वार्थाची नव्हे तर सेवेची भावना असते तेव्हाच हे शक्य होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. तेजस माऊ यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साधेपणाने, सहजतेने आणि मोहकतेने केले. डॉ. एल.डी. शुक्ला, डॉ. एच.बी. सिंग, डॉ. रमण मिस्त्री, डॉ. अमर द्विवेदी, डॉ. महेंद्र चतुर्वेदी, डॉ. दिलीप त्रिवेदी, डॉ. ऋजुता दुबे, डॉ. मनन मेहता, डॉ. जान्हवी मेहता आणि डॉ. युनूस यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पूर्णिमा बिदये, डॉ. अंजू चेतिया, डॉ. शिल्पा डोखा, डॉ. विनीत मिश्रा, डॉ. सर्वेश शर्मा, डॉ. वसंत वल्लेपवार आणि डॉ. एम.पी. शाह या सर्वांनीआपले योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. हर्षद जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. सामुदायिक राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.