जिल्हा परिषद पालघर येथे इंदिरा गांधी जयंती साजरी


जिल्हा परिषद पालघर येथे इंदिरा गांधी जयंती साजरी
पालघर (प्रतिनिधी)भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) इजाज अहमद शरीक मसलत यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
१९ नोव्हेंबर १९१७ रोजी जन्मलेल्या इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. दूरदृष्टी, ठाम नेतृत्व आणि कठोर निर्णयक्षमता यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. बांगलादेश मुक्ती संग्रामाला दिलेले नेतृत्व, बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि हरित क्रांतीस मिळालेली चालना हे त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय टप्पे मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ उपस्थितांनी घेतली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.