मुलुंड स्थानकात लोकल ट्रेनमधून पडून मुंबई पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू;

मुलुंड स्थानकात लोकल ट्रेनमधून पडून मुंबई पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू;
मुंबई प्रतिनिधी:( सतीश पाटील )
मुंबई: नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच मुंबई पोलीस दलातून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. सहार वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराचा मुलुंड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. देविदास सस्ते असे या मृत हवालदाराचे नाव असून, ते कर्तव्य बजावून आपल्या घरी परतत असताना हा अपघात घडला.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, देविदास सस्ते (वय अंदाजे ५० च्या आसपास) हे सहार ट्रॅफिक डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. बुधवारी (३१ डिसेंबर) आपली ड्युटी संपवून ते कल्याण येथील आपल्या घरी जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होते. सायंकाळी ५ च्या सुमारास ट्रेन मुलुंड स्थानकात शिरत असताना फूटबोर्डवर उभे असलेले सस्ते यांचा अचानक तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्मवर पडले.
त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांनी (पोलीस शिपाई ब्राम्हणे, भगत आणि महाले यांच्या मदतीने) त्यांना तातडीने मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
नियतीचा क्रूर खेळ: नुकतीच केली होती मृत्यूवर मात या घटनेची अधिक माहिती अशी की, देविदास सस्ते हे गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेजेस आढळले होते, ज्यामुळे ते ७ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर या कालावधीत वैद्यकीय रजेवर होते. कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि उपचार करण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारणा झाल्याने २६ नोव्हेंबरला ते पुन्हा उत्साहाने सेवेत रुजू झाले होते. हृदयविकारासारख्या गंभीर संकटातून बाहेर पडल्यानंतर, अवघ्या महिनाभरातच अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस दलात आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस दलात शोककळा सस्ते हे मनमिळावू स्वभावाचे होते आणि त्यांना साहित्य व वाचनाची आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पोलीस विभाग त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करत आहे.