Uncategorized

लेवा पाटीदार मंडळ, पालघरचे ३२ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न

लेवा पाटीदार मंडळ, पालघरचे ३२ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न
पालघर (प्रतिनिधी):
लेवा पाटीदार मंडळ, पालघर यांचे ३२ वे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध व सुसंस्कृत वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्री संजय महाजन सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे सचिव श्री नितीन भारंबे सर यांनी केलेल्या सुस्पष्ट व अभ्यासपूर्ण प्रास्ताविकाने झाली. त्यांनी गेल्या वर्षभरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेत मंडळाच्या कार्याची माहिती उपस्थित समाजबांधवांना दिली.
यानंतर खजिनदार प्रा. श्री एस. पी. चौधरी सर यांनी मंडळाचा जमा–खर्चाचा पारदर्शक व सविस्तर हिशेब सादर केला.
कार्याध्यक्ष श्री एल. बी. महाजन साहेब यांनी आपल्या मनोगतात समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजूट, सकारात्मक विचारसरणी, परस्पर सहकार्य व सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्री संजय महाजन सर यांनी समाजासमोरील सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने यावर सखोल व सकारात्मक विचार मांडले. आजच्या स्पर्धात्मक युगात समाजाने शिक्षण, कौशल्यविकास, तंत्रज्ञान, रोजगार, उद्योजकता व संस्कृती जपणे या सर्व बाबींवर समान भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुण पिढीने शिक्षणासोबत कौशल्याधारित रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी शोधाव्यात, तर ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय गायनाने कार्यक्रमात रंगत
अध्यक्षीय भाषणानंतर प्रा. श्री संजय महाजन सर यांनी सादर केलेले सुरेल व भावपूर्ण गीत हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित समाजबांधव मंत्रमुग्ध झाले व संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.
या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे श्री दिलीप कोल्हे होते. त्यांनी पालघरवासीयांच्या एकजुटीचे कौतुक करत समाजाच्या विकासासाठी आर्थिक मदत देऊन आपली सामाजिक बांधिलकी व्यक्त केली.
तसेच प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. सुदीप चौधरी सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी समाजकार्याचे महत्त्व अधोरेखित करत आर्थिक मदत जाहीर केली.
नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार
यावेळी पालघर नगरपरिषदेचे नवनियुक्त नगरसेवक श्री राजेंद्र पाटील व नगरसेविका सौ. प्रीती मोरे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नगरसेवक श्री राजेंद्र पाटील यांनी समाजासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले, तर नगरसेविका सौ. प्रीती मोरे यांनी समाजासाठी २५ खुर्च्या देऊन प्रत्यक्ष योगदान दिले. यासह अनेक समाजबांधवांनीही खुर्च्या देऊन समाजकार्याला हातभार लावला.
तसेच लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री संजय महाजन सर यांची रोटरी क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान दहावी, बारावी, पदवी व पदविकाधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक यशाबद्दल गौरव करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
श्रीमती सुनंदा लिलाधर महाजन व श्रीमती प्रशाली प्रवीण राणे यांनी दिलेल्या स्नेहभोजनाबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एल. बी. पाटील सर यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने केले.
समारोपप्रसंगी श्री अनंत भंगाळे यांनी सर्व मान्यवर, पदाधिकारी, देणगीदार व उपस्थित समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.
एकूणच लेवा पाटीदार मंडळ, पालघर यांचे ३२ वे वार्षिक स्नेहसंमेलन सामाजिक एकोपा, शैक्षणिक प्रोत्साहन, सांस्कृतिक जपणूक व समाजबांधिलकीचा आदर्श ठेवणारे, अत्यंत प्रेरणादायी व स्मरणीय ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button