क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आश्रम शाळा शिगाव येथे विशेष व्याख्यान



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आश्रम शाळा शिगाव येथे विशेष व्याख्यान
शिगाव (प्रतिनिधी):
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या थोर कार्याची व विचारांची माहिती देण्यासाठी जीवन विकास संस्थेची अनुदानित आश्रम शाळा, शिगाव येथे शनिवार दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्रीमती डॉ. स्मिता सुधीर माळवदे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
आपल्या व्याख्यानात डॉ. स्मिता माळवदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, समाजसुधारणा व महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याची सविस्तर व प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून समानता, स्वाभिमान व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या विचारप्रवर्तक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व व समाजाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निश्चितच निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी तयार केलेला पुष्पगुच्छ व वारली पेंटिंगचे ग्रीटिंग कार्ड देऊन प्रमुख वक्त्या डॉ. स्मिता माळवदे यांचे स्वागत माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी केले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री उमतोल सर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री प्रदीप रिंजड सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
याप्रसंगी डॉ. स्मिता माळवदे यांनी शाळेसाठी आपली काही स्वलिखित पुस्तके तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी शैक्षणिक पुस्तके भेट स्वरूपात दिली. या उपक्रमामुळे शाळेच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर पडली असून विद्यार्थ्यांना वाचन व अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध झाले आहे.
एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून साध्य झाले.