Uncategorized

७२ तास जीव तोडून ड्युटी, मोबदला फक्त ५०० रुपये!पोलीस कर्मचाऱ्याचा सरकारविरोधात जाहीर निषेध, मानधन परत करून खळबळ

७२ तास जीव तोडून ड्युटी, मोबदला फक्त ५०० रुपये!
पोलीस कर्मचाऱ्याचा सरकारविरोधात जाहीर निषेध, मानधन परत करून खळबळ
प्रतिनिधी | महाराष्ट्र
“खाकी वर्दीतला माणूसही शेवटी माणूसच असतो!”
हा सवाल सध्या संपूर्ण महाराष्ट्रात घुमतो आहे.
निवडणुकीच्या काळात लोकशाही अबाधित राहावी म्हणून रात्रंदिवस, ऊन-पावसात, उपाशीपोटी उभे राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कष्टांची सरकारला किंमत आहे की नाही, असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी तब्बल ७२ तास सलग ड्युटी करूनही अवघे ५०० रुपये मानधन दिले जात असल्याने पोलीस दलात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या अन्यायाविरोधात पोलीस कर्मचारी विलास मुंडे यांनी थेट बंड पुकारले आहे. “हा मोबदला अपमानास्पद आहे,” असे सांगत त्यांनी मिळालेले ५०० रुपये सरकारकडे परत करत जाहीर निषेध नोंदवला. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
निवडणूक काळात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या जातात. घरदार, कुटुंब, आरोग्य, झोप आणि जेवण याची कोणतीही पर्वा न करता ते रस्त्यावर उभे असतात. नेत्यांच्या सभांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात, जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा वाहतो, पण लोकशाहीचे खरे रक्षक असलेल्या पोलिसांना मिळतात ते फक्त ५०० रुपये!
“ही मदत नाही, ही कष्टांची थट्टा आहे,” अशी भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. अनेक पोलीस कर्मचारी भीतीपोटी गप्प राहतात, पण विलास मुंडे यांनी उचललेले पाऊल हजारो कर्मचाऱ्यांच्या मनातील असंतोषाचे प्रतिनिधित्व करत आहे.
हा प्रश्न केवळ एका कर्मचाऱ्याचा नसून, संपूर्ण पोलीस दलाच्या सन्मानाचा आहे.
सरकारने आता तरी डोळे उघडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला साजेसा मोबदला, विश्रांती आणि मूलभूत सुविधा देण्याचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
लोकशाही टिकवण्यासाठी ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, त्यांनाच जर अन्याय सहन करावा लागत असेल, तर हा केवळ पोलिसांचा नव्हे, तर लोकशाहीचाच पराभव ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button