१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडानंडोरे येथे ‘अरुणोदय – सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’चा शुभारंभ .




१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा
नंडोरे येथे ‘अरुणोदय – सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’चा शुभारंभ .
पालघर (प्रतिनिधी)सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत घरोघरी सिकलसेल तपासणी, निदान, उपचार व आवश्यक संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या विशेष अभियानाचा शुभारंभ दि. १५ जानेवारी २०२६ रोजी नंडोरे आयुष्यमान आरोग्य मंदिर, पालघर येथे “अरुणोदय – सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान” या नावाने करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरळकर, डॉ. वैदही (DRCHO), नोडल अधिकारी डॉ. दीपक वाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तन्वीर शेख, जिल्हा सिकलसेल समन्वयक इंदल जाधव, CHO प्रतीक्षा गिरे, अंकिता जाधव (तालुका सिकलसेल नोडल अधिकारी) यांच्यासह आरोग्य विभागातील आशा सेविका व BF कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम मा. उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर तसेच विभागीय नोडल अधिकारी डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी करण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सिकलसेल हा अनुवंशिक व गंभीर रक्ताचा आजार असून नागरिकांनी सिकलसेल सोल्यूबिलिटी तपासणी करून घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
सिकलसेल आजाराची लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असून, या आजारात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, भूक न लागणे, हात व पायांवर सूज येणे, सांधेदुखी, तीव्र वेदना, लवकर थकवा येणे तसेच चेहरा निस्तेज दिसणे अशी लक्षणे आढळून येतात.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी सांगितले की, सिकलसेल आजाराची वेळीच तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास रुग्ण निरोगी व सुरक्षित आयुष्य जगू शकतो. त्यामुळे या विशेष पंधरवड्यात आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणीस नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच मोहिमेत सहभागी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन तपासणीस मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या महत्वाकांक्षी अभियानाचा लाभ घेऊन सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करावी व समाज निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असेही यावेळी आवर्जून सांगण्यात आले.