Uncategorized

एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), पालघर येथे संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन उत्साहात संपन्न.

एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), पालघर येथे संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन उत्साहात संपन्न
पालघर (प्रतिनिधी) —
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), पालघर येथे संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
या तंत्रप्रदर्शनाचे उद्घाटन श्री. रघुनाथ धुमाळ (अध्यक्ष – IMC, डेप्युटी मॅनेजर, JSW) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री. अनंत भंगाळे (प्रभारी प्राचार्य) यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तंत्रप्रदर्शन हे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्य, नाविन्यपूर्ण विचारसरणी व उद्योगाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कामातून आत्मसात केलेली कौशल्ये समाज व उद्योग क्षेत्रासमोर मांडण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. रघुनाथ धुमाळ यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या प्रोजेक्ट्सचे विशेष कौतुक केले. आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ITI मधून घडणारे कुशल मनुष्यबळ हे उद्योगजगताचा कणा असल्याचे त्यांनी सांगितले. अशा तंत्रप्रदर्शनातून विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. सचिन संखे (प्राचार्य) यांनी फिटर, इलेक्ट्रिशन, यांत्रिक वातानुलिकरण, वेल्डर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राम असिस्टंट तसेच ड्रेस मेकिंग या विविध व्यवसायांतील प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेले उद्योगाभिमुख व नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स अत्यंत प्रशंसनीय असल्याचे सांगितले. प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळेच प्रशिक्षणार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तंत्रप्रदर्शनात प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष कार्यरत मॉडेल्स व तांत्रिक प्रोजेक्ट्स सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. श्री. अनंत भंगाळे (प्र. प्राचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली के. बी. अहेर, उज्वला वीर, सुमितसिंग सोलंकी, चैतन्य भानुसे, निलेश धोडी, ऋषी कुमार घरत, शुभांगी भोईर, दत्ताराम गवस, प्रमोद पाटील, कार्तिक गायकवाड, दर्शना लहांगे, आरती वनगा व रोशन संखे यांनी तंत्रप्रदर्शनाचे नियोजन व अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुमितसिंग सोलंकी यांनी केले तर चैतन्य भानुसे यांनी आभार प्रदर्शन केले. या तंत्रप्रदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून उद्योगजगताशी त्यांचा दृढ संबंध निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button